मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट
By Admin | Published: January 23, 2015 11:12 PM2015-01-23T23:12:27+5:302015-01-23T23:12:43+5:30
नाशिकमध्ये ढगाळ वातावरण
नाशिक : शहरात पडलेल्या थंडीचे प्रमाण कमी होत चालले असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट दिसू लागले आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. मात्र त्यामुळे तपमानात घट होणार नसल्याचेही म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकचे तपमान किमान पातळीवर पोहोचले होते. राज्यातील सर्वाधिक थंड शहर अशीही नाशिकची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र हळूहळू तपमानाचा पारा वाढू लागला.
जानेवारीच्या मध्यानंतर तपमानात होत असलेलली वाढ ही ग्रीष्माची चाहूल समजली जात असतानाच पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यात नाशिकमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतरही शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तपमानही अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे १२.५ अंश सेल्सियस इतकेच नोंदविले गेले. आगामी काही दिवस पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता असली तरी तपमानात घट होणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.