जिल्ह्यात पावसाची हजेरी
By Admin | Published: June 26, 2016 12:04 AM2016-06-26T00:04:21+5:302016-06-26T00:04:21+5:30
शेतकरी सुखावला : मुंबई-आग्रा महामार्गावर धुक्याचे साम्राज्य
इगतपुरी : पावसाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर दमदार पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.
यंदा पावसाने वीस ते एकवीस दिवस उशिरा हजेरी लावली असली तरी आता बळीराजा भात पेरणीच्या कामाला लागला आहे.
आज सकाळ पासून पाऊस रिमझिम पाऊस पडत होता. दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला. शहरातील मुख्यबाजर पेठेत पावसामुळे ग्राहकांची गर्दी मंदावली होती .सर्वाधिक वर्दळीचा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गावरील वाहतुक कसारा घाटातील धुक्यामुळे काहीकाळ मंदावली होती. कसारा घाटातील महामार्गावर सर्वत्र धुके पसरले होते. धुक्यामुळे वाहन चालकांना वाहनांचे दिवे लावुनच मार्गक्रमण करावे लागत होते.
त्र्यंबक : त्र्यंबक परिसरात शनिवारी रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारपासून त्र्यंबक परिसरात पावसास सुरुवात झाली असून, पेरणीसाठी त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस नसल्याने अद्याप त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीस सुरुवात केली आहे. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (वार्ताहर)
(वार्ताहर)