नांदूरशिंगोटे परिसरात पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:02+5:302021-07-29T04:15:02+5:30
नांदूरशिंगोटे : जिल्ह्याच्या अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असताना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात मात्र गेल्या काही ...
नांदूरशिंगोटे : जिल्ह्याच्या अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असताना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी पिकांवर ताण पडला असून, त्यांची वाढ खुंटली आहेत. खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. जुलै महिन्यात अद्यापपर्यंत फक्त ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोकणासह मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर असला तरी सिन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने अजूनही ओढ दिली आहे. संपूर्ण जुलै महिना संपत असला तरी नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा पत्ता नाही. गेल्या पंधरा दिवसांत येथे मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दररोज ऊन व सावलीचा खेळ सुरू असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्या पिकांना ऊर्जितावस्था आणू शकत नाही.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे जोरदार आगमन झाले होते. मात्र, त्यानंतर परिसरातील काही भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला तर काही ठिकाणी हुलकावणी दिली आहे. यावर्षी जुलै महिना संपत येत असतानाही समाधानकारक पाऊस न बरसल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका वाढला आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती. या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर जून महिना कोरडाठाक गेला, तर जुलै महिन्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. तालुक्यात पेरणीलायक पाऊस न झाल्यामुळे पहिल्या पावसात पेरणी झालेली पिके वाया जाऊ लागल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
इन्फो...
गतवर्षी ५५० मिलीमीटर पावसाची नोंद
गतवर्षी नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या-नाल्यासह पाझरतलाव, बंधारे, केटीवेअर तुडुंब भरले होते. गेल्या अनेक वर्षात प्रथमच भोजापूर धरण भरण्यापूर्वीच नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे पूर्णपणे भरले होते, तर जाम नदी जुलै महिन्यातच दुथडी भरून वाहत होती. गतवर्षी जून व जुलै महिन्यात ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती तर दोन वर्षांपूर्वी ४०० मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे दोन्हीही वर्षे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने जून महिन्यात १७४ व २७ जुलैपर्यंत ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
फोटो ओळी : २८ जामनदी
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने कोरडीठाक असलेली कणकोरी येथील जामनदी नदी.
280721\28nsk_20_28072021_13.jpg
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने कोरडीठाक असलेली कणकोरी येथील जामनदी नदी.