नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:11 AM2018-09-19T01:11:09+5:302018-09-19T01:11:42+5:30
वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
नाशिकरोड : वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
यंदा पावसाळा ऋतुमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गात थोडेसे चिंतेचे वातावरण आहे. श्रावण महिन्यातदेखील नेहमीप्रमाणे पाऊस न पडल्याने ऐन गणेशोत्सव-नवरात्रीत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. गेल्या २०-२२ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू राहिल्यामुळे सायंकाळपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तर पादचारी, दुचाकी चालकांना पावसामुळे आजुबाजूला आडोसा घ्यावा लागला होता.
पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी थोड्या प्रमाणात वाहत होते. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
गणेशोत्सव मंडळांना लागू केलेल्या जाचक अटींमुळे मंडळांची रोडावलेली संख्या, वाढती महागाई, अनुत्साह आदी कारणांमुळे नाशिकरोड परिसरात हातावर मोजण्याइतकेच मोठे गणेशोत्सव मंडळे राहिली आहेत. मंडळाचा देखावा कार्यकर्त्यांनी पूर्ण साकारण्यात दोन-तीन दिवस गेल्यानंतर घरोघरी गौरी-गणपतीमुळे देखावे बघण्यास म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. गणेशोत्सवास शेवटचे पाचच दिवस शिल्लक असताना दुपारपासून पावसाचे आगमन सुरू झाले होते. सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे भाविक देखावे बघण्यास घराबाहेर न पडल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्यात सुरू झालेल्या पावसामुळे कार्यकर्ते व भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
एकलहऱ्यात हलक्या सरी
एकलहरे : परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. दुपारनंतर आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली व संपूर्ण पंचक्रोशीत पावसाचे वातावरण तयार झाले. साडेचारच्या सुमारास बºयापैकी पाऊस कोसळला; मात्र दहा मिनिटातच त्याचा जोर कमी झाला. अधूनमधून कोसळणाºया या सरींमुळे सर्वत्र जमिनीत ओल निर्माण झाली असून, आणि हवेत गारठा जाणवू लागला. या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना जीवदान मिळाले.