जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By Admin | Published: June 21, 2016 10:42 PM2016-06-21T22:42:27+5:302016-06-21T22:42:47+5:30

कुंदेवाडी, रामनगर भागात एकाच पावसात बंधारे ‘ओव्हरफ्लो’

Rainfall of rain everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

googlenewsNext

नाशिक : मृग नक्षत्रातील अखेरच्या चरणाच्या शेवटच्या दिवशी तुरळक हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी (दि.२१) जिल्ह्यात बहुतांश भागात काहीशी दमदार हजेरी लावली. मंगळवारी ८ वाजेपर्यंत शहरात ७.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
यंदाच्या मोसमात मान्सून संपूर्ण मृग नक्षत्रात बरसलाच नाही. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या भागातील काही परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. सायंकाळी निफाड तालुक्यातील पिंपळगावसह अन्य भागात रस्ते भिजण्यापुरतीच पावसाची हजेरी होती. त्यानंतर सोमवारी (दि.२०) सकाळी ८ वाजेपर्यंत ०.८ मिलिमीटर अत्यल्प पावसाची नोेंद करण्यात आली होती. त्यानंतर दिवसभरात दुपारी व सायंकाळी काही प्रमाणात तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली होती. काल दिवसरभही नाशिक शहरासह अन्य परिसरात पावसाने कमी- अधिक स्वरूपात हजेरी लावली. दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. नाशिकसह येवला, नांदगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव, निफाड यांसह बहुतांश तालुक्यात पावसाची हजेरी होती. काल सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हवामान खात्याकडे दिवसभरात शहरात १.३ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२१) रात्री आर्द्रा नक्षत्र लागणार असून, आर्द्रा नक्षत्रात आता पाऊस किती पडतो, याकडे जिल्ह्णातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचले होते. तर काही सखल भागात तुरळक स्वरूपात चिखल झाल्याचे चित्र होते.
सिन्नर : शहर व तालुक्यातल्या काही भागात मृग नक्षत्राचा समारोप दमदार सरी कोसळून झाला. मंगळवारी दुपारी शहरासह काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. पूर्व भागात पावसाने गुंगारा दिला असला तरी कुंदेवाडी, रामनगर, डुबेरे, दापूर, दोडी, माळवाडी, खंबाळे शिवारात जोरदार पाऊस झाला. आर्द्रा नक्षत्र मंगळवारी रात्री लागले. मृग नक्षत्राने जोरदार पाऊस पाडून समारोप केला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सिन्नर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. मात्र पाऊस येत नव्हता. सोमवारी पावसाने रिमझीम हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास शहरात पावसाचे आगमन झाले. सुमारे तासभर सिन्नर शहरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. डुबेरे, रामनगर, ठाणगाव, हिवरे, पिंपळे, पाटोळे या भागात दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर कुंदेवाडी शिवारात सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाल्याने शिवारातील अनेक बंधारे ओव्हरफ्लो झाले. दोडी, दापूर, खंबाळे, माळवाडी, चास या भागातही जोरदार पावसाने सलामी दिली. दोडी, दापूर, माळवाडी, खंबाळे भागात मुसळधार पावसाने शेतात पाणी साचले होते. बांध भरून वाहत असल्याचे चित्र होते. गुळवंच, मुसळगाव, नायगाव, जोगलटेंभी, सोनगिरी, जायगाव, देशवंडी, ब्राह्मणवाडे, कोनांबे, सोनांबे या गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या भागात पावसाचा जोर फारसा नव्हता. मात्र पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत असताना काही भागात मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. या भागातील शेतकऱ्यांची निराशा झाली.
देवळा : शहर आणि परिसरात पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावल्याने नागरिक चांगलेच सुखावले आहेत. या पावसाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असले, तरी पावसाने गटारी तुंबल्याने प्रशासनाचे दावे फोल ठरले आहेत. सोमवारी सायंकाळी हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून पुन्हा दिवसभरातून अधूनमधून हजेरी लावत शहरवासीयांना सुखावले. मात्र या पावसाने गटारी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर आले. इंदिरानगर, विद्यानगर भागात ही स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाचे दावे फोल ठरले आहेत. त्यामुळे गटारींची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (लोकमत चमू)

Web Title: Rainfall of rain everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.