सुरगाणा, दिंडोरी, लोहोणेरला पाऊस
By admin | Published: July 15, 2017 12:44 AM2017-07-15T00:44:23+5:302017-07-15T00:44:37+5:30
सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. केवळ पाच ते दहा मिनिटे पाऊस हजेरी लावून परत जात होता. मात्र गुरुवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर तो संपूर्ण रात्र व दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही कमीअधिक प्रमाणात सुरूच होता. एकदा पाऊस लागला की तो लवकर जातच नाही हे येथील पावसाचे वैशिष्ट्य आहे. अजूनही येथे पाऊस सुरूच आहे. रात्रभर पाऊस झाल्याने सुरगाणा, उंबरठाण, बाऱ्हे, मनखेड, बोरगाव, करंजुल (सु), पळसन इत्यादी ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले. असाच पाऊस सुरू राहिला तर झालेली लावणी (आवणी) गेल्या वर्षीप्रमाणे वाहून जाऊन नुकसान होण्याची चिंता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाने सातत्य ठेवल्याने आजचा आठवडे बाजार कमी भरला. तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले असून, सर्वाधिक पाऊस सुरगाणा येथे झाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरगाणा येथे १११ मि.मी., बोरगाव येथे १०८ मि.मी., मनखेड येथे ९३.०७ मि.मी., उंबरठाण येथे ९०.०८ मि.मी., तर बाऱ्हे येथे ८३.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी ५८२ मि.मी. राहिली आहे.
धरण क्षेत्रात पाऊस
लोहोणेर : चणकापूर धरण क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला आहे. लोहोणेरचा डावा कालवाही पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. चणकापूर धरण क्षेत्रात व कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, येथील बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. येथील बंधाऱ्यातून गिरणा नदीपात्रात होणारा विसर्ग यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अनुभवयास मिळाला आहे. गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत पूरपाण्याची वाढ झाल्याने पाटबंधारे खात्याच्या वतीने डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून, यंदा प्रथमच या डाव्या कालव्यास हे पूरपाणी सोडण्यात आले आहे .