त्र्यंबकेश्वरला पर्जन्यवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:43 PM2017-08-20T22:43:14+5:302017-08-21T00:23:09+5:30
परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.
त्र्यंबकेश्वर : परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.
परिसरातील रस्त्यांवर श्रावण महिन्यात प्रचंड संख्येने येणाºया भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाण्यामुळे एका जागेहून दुसºया ठिकाणी हलले. काही दुकानधारकांच्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्र्यंबकेश्वरला श्रावणी शनिवारनिमित्त येऊन मुक्कामी असलेल्या भाविकांना येथेच थांबून राहावे लागले. टॅक्सी व बससेवेवरही या पुराच्या पाण्याचा विपरीत परिणाम झाला. आतापर्यंत त्र्यंबकेश्वरला १८६० मिमी पावसाची नोंद झाली असून, अद्यापपावेतो पावसाळा संपला नसल्याने अजूनही जोरदार पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्र्यंबकला जोरदार पाऊस पडला की, गंगासागर तलाव, अहिल्या धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असते. अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाले की, निदान अहिल्या नदी तरी वाहते पण गंगासागरचे पाणी थेट महाजन चौकातून गावात वाहते. त्यात म्हातार ओहळाची भर पडते. दुसरीकडे तेलगल्लीकडून येणाºया नीलगंगा ओहळ हे सर्व गोदावरीत एकत्र येऊन गावात पूर येतो. सर्वत्र पाणीच पाणी चहूकडे..! अशी परिस्थिती निर्माण होत असते. महाजन चौक, कुशावर्त परिसर, मेनरोड, भाजी मंडई, डॉ. आंबेडकर चौक आदी परिसरात सर्वत्र पाणी असते. कमरेएवढे पाणी असते. गावाबाहेर असलेल्या गोदावरी पुलावरून पाणी वाहत होते. तर पूर ओसरल्यावर घरात घुसलेले पुराचे पाणी उपसताना नागरिक दिसत होते. पूर यायचे अजून एक कारण म्हणजे पालिकेकडून समाधानकारकरीत्या पात्राची सफाई झालेली नाही.
पाटोदा परिसरात पिकांना जीवदान
पाटोदा : रविवारी सकाळपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, पिकेही जोमदार आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील ऐन फुलोºयात आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. पिके वाया जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन गरजेच्या वेळीच पावसाने हात दिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पालखेड कालव्यातूनही रोटेशन सुरू आहे. ज्या शेतकºयांकडे व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत होते; मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकºयांची मोठी धडपड सुरू होती. रविवारी सकाळपासून ठाणगाव, पिंपरी, कानडी, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ पिंपळगाव लेप परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली़