येवल्यात पिकांना पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:58 PM2020-07-25T20:58:06+5:302020-07-26T00:23:43+5:30
येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तालुक्यात यावर्षी मान्सूनपूर्व व प्रारंभी चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकरी वर्गाने खरीप मका, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, बाजरी आदी पिके घेतली. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर मका, सोयाबीन पिके आहेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावर उंट अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.
हळूहळू तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र अळींनी बाधित झाल्याने मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांवरील अळींच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी ेकेली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
खरिपाची पिके जोमात असताना गेल्या दहा-पंधरा दिवसात पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांत तालुक्यात सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अंदरसूल परिसरात मका पीक पडले तर पाटोदा, निळखेडे, कातरणी, विखरणी, देशमाने, मानोरी परिसरात पिके पाण्याखाली आली. आधीच अळींच्या आक्रमणाने धोक्यात आलेल्या पिकांना पावसाच्या पाण्याने संजीवनी मिळाली असली तरी काही भागात अतिपावसाने पिके धोक्यात आली आहेत.
पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी
तालुक्यात यावर्षी सोयाबीनप्रमाणेच मका पिकाची स्थिती आहे. अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचा पोंगा बाधित झाला आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अळीग्रस्त मका, सोयाबीन पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागास द्यावे, नुकसानग्रस्त मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.