पावसाने देवरगावला गाय ठार; शिरसाणेत पोल्ट्रीफार्मचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:49 PM2020-06-04T21:49:10+5:302020-06-05T00:35:45+5:30
चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.
चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले. चांदवड तालुक्यात दिवसभर वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. मात्र रात्री ९ वाजेनंतर चांदवड व परिसरात पावसाने जोर धरला तर जोरदार वादळ होते. गुरुवारी दिवसभर ११.३० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने उष्णतेचे प्रमाण जाणवत होते. पाऊस बुधवारी मध्यरात्रीनंतर थांबला असून, या वादळी वारा व पावसामुळे चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील गोविंद श्रीपाद शिंदे यांची गाय मरण पावली तर त्यांचे अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. तर शिरसाणे येथील दिलीप कारभारी देशमाने यांच्या पोल्ट्री फार्म पडून त्यात तीन हजार पक्षी मरण पावल्या आहेत.
वाहेगावसाळ येथील रामदास खंडेराव गांगुर्डे यांचे पत्र्यांचे शेड, पिंपळद येथील ममताबाई रामू चौरे यांचे गट नंबर १८८ मधील द्राक्षबागेचे नुकसान झाले. सोमनाथ छबू पवार यांच्या घराचे नुकसान झाले. चिखलांबे येथील एकनाथ नारायण पगार यांचा बैलांचा गोठा, चिखलांबे येथील रघुनाथ सावळीराम गांगुर्डे यांचे घराचे पत्रे, आडगाव येथील महेंद्र तुकाराम यशवंते घराची भिंत, वडाळीभोई येथील सचिन रमेश जगताप यांचे शेडनेट उडाले, कुंदलगाव येथील दीपक गंगाधर अहिरे यांचे घराचे पत्रे उडाले.
तालुक्यातील नुकसानीची माहिती तलाठ्यांमार्फत घेतली जात असून, एक-दोन दिवसात नुकसानी सर्व माहिती प्राप्त होईल, असे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले. मात्र मोठ्या स्वरूपाचे नुकसान तालुक्यात झालेले नाही.