निफाड तालुक्यात रिमझिम पाऊस, द्राक्ष पंढरीत उत्पादक धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:39 AM2021-12-01T11:39:11+5:302021-12-01T11:42:24+5:30
या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नाशिक- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळ पासून द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे आता, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.
सकाळपासूनच वातावरणात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळत आहे. एकीकडे थंडीचा घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारस पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्षउत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा अतोनात नुकसान झाले होते. द्राक्ष बागाची कूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. द्राक्ष आणि कांदा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कांदा जमिनीत खराब होऊ शकतो तर द्राक्ष मण्यांना तडे, भुरी, डाऊनी, गळ, कूज, या समस्या निर्माण होऊ शकतात. लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.