त्र्यंबकला पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 11:21 PM2021-12-01T23:21:55+5:302021-12-01T23:23:46+5:30
त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे.
त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे. पाऊस ढगफुटी झाल्याप्रमाणे धुंवाधार कोसळत नुकसान करत आहे. वसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने ओहळ वाहायला लागले आणि शेतात सोंगून (कापणी केलेले) ठेवलेले भात पाण्यात भिजले आहे. शिवारात सर्वत्र अवकाळीच्या तडाख्यातून पीक वाचविण्याची लगबग दिसून येत आहे.
नांदगावी जनजीवन विस्कळीत
नांदगांव : बेमोसमी पावसाने दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात प्रचंड गारठा पसरला असून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे .दुपारी सुमारे एक तास ढगाळ वातावरणात झिम झिम पाऊस कोसळत होता, कोसळणाऱ्या पावसाचे थेंब अत्यंत गारांसारखे थंड लागत होते.
हवेतील गारवा वाढत गेल्याने थंडीचा कडाका वाढत गेला आणि सायंकाळी ६ वाजेनंतर वाढत्या गारठ्यात पुन्हा पावसाचे थेंब कोसळत होते. थंडीमुळे शहरातील व ग्रामीण भागातिल लहान मोठे व्यावसायिक सायंकाळ होताच बंद करुन लवकरच घरी गेले.
मनमाडला ढगाळ पावसाळी वातावरण
मनमाड : ऐन हिवाळ्यात ढगाळ पावसाळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून या प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम कांदे,भाजीपाला आणि पिकांवर होत असल्याने निसर्गापुढे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाले आहेत . मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ पावसाळी वातावरण होते . बुधवारी सकाळपासून तर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले .