पावसाचा दणका, पिकांवर रोगराईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:11+5:302021-08-20T04:18:11+5:30
येवल्यात पिकांना जीवदान येवला : यंदा खरीप हंगामाचे चित्र बदलत्या पावसाने बदलवले आहे. पावसानुसार पीकबदल व पेरण्या मागेपुढे झाल्या ...
येवल्यात पिकांना जीवदान
येवला : यंदा खरीप हंगामाचे चित्र बदलत्या पावसाने बदलवले आहे. पावसानुसार पीकबदल व पेरण्या मागेपुढे झाल्या आहेत. तालुक्यात साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, कांदा रोपे आदी पिके धोक्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी पाणी भरले परंतु ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नव्हती, ती मंडळी आकाशाकडे डोळे लावून होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्रच पाऊस सुरू असल्याने पिके जगणार असली, तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला. पहिल्या दिवशी तास-दोन तास जोरदार पाऊस झाला, नंतर मात्र पावसाची रिमझिम सुरू झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रिमझिम पावसाने तग धरून राहिलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, कांदारोपे लागणीला आली असताना सततच्या पावसाने रोपे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बरोबरच मूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पन्न घटणार असून नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसाने जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढते आहे. पश्चिम पट्ट्यात सलग दोन-तीन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. मुखेड परिसरात तब्बल सव्वा महिना पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने सोयाबीन, मका, ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंदरसुल परिसरातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. पावसाअभावी सोयाबीन पिकाची फुलगळ झाली. मका पिकाला ऐन बिटी निघण्याच्या वेळेत पावसाने ओढ दिली. त्यामुळे काही भागात पीक जळायला लागले होते. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याने पिकाला पाणी देऊन पीक वाचवले. बाजरी पीक फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिल्याने सुकायला लागले होते. मात्र, झालेल्या पावसाने बाजरी पिकाला जीवदान मिळाले आहे. कांदारोपे लागवडीला आली आहेत. सततच्या पावसाने पाणी तुंबून रोपे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो पिकावरही किडीचा प्रादुर्भाव होऊन सततच्या पावसाने पाने सडण्याची व त्यामुळे तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फोटो- १९ येवला क्रॉप
-----------------------------
190821\19nsk_30_19082021_13.jpg~190821\19nsk_31_19082021_13.jpg
फोटो- १९ येवला क्रॉप ~१९ नांदगाव फ्लड