पावसाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:16 AM2017-08-29T01:16:12+5:302017-08-29T01:16:18+5:30
श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता.
नाशिकरोड : श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता. पोलीस प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी, नियम यामुळे मंडळांना अगदी वेळेवर मंडपाचा आकार बदलण्याची, तर काही मंडळांना जागा बदलण्याची पाळी आली. दिवसेंदिवस कमी होत चाललेला सहभाग, वर्गणी, जाहिरातीची चणचण आदी कारणांमुळे मंडळांची संख्या घटत चालली आहे. अशा सर्व परिस्थितीवर मात करून गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वैतागून सोडले होते. श्री गणरायाची स्थापना होऊन सोमवारी चौथा दिवस होता. मात्र सलग सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे भाविक घराबाहेर पडत नसल्याने मंडळाच्या देखाव्याकडे सामसूम पसरली आहे, तर अर्धवट देखावा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते व कारागिरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. थोडीशी विश्रांती घेत बरसणारा वरूणराजा यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचा बंदोबस्त अपुरा
काही मंडळांच्या ठिकाणी दिवसा, तर काही ठिकाणी रात्री असणारा पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा अद्याप बंदोबस्त लावलेला नाही. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व भाविक यांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसामुळे बंदोबस्ताचा ताण तूर्त सैल झाला असला तरी सर्व मंडळांजवळ बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली जात आहे.