पेलिकन पार्कच्या जागेवर महिला रुग्णालय उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:16 AM2018-09-26T00:16:49+5:302018-09-26T00:17:11+5:30
शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे.
नाशिक : शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे. भाजपाच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या मध्य मतदारसंघात रुग्णालय होण्यासाठी प्रयत्नशील असताना पेलिकन पार्कची जागा पश्चिम मतदारसंघात मोडली जाते व सदरची जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडीत आहे. त्यामुळे जर ही मागणी मंजूर झाल्यास भाजपांतर्गत सुंदोपसुंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९ साली तत्कालीन आघाडी सरकारने आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीनुसार खान्देश पॅकेज अंतर्गत १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले होते. यानंतर मनसेचे आमदार वसंत गिते यांनी रुग्णालयासाठी २४ कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यानंतर विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र त्यांच्याच पक्षातील सुंदोपसुंदीमुळे निव्वळ जागेअभावी महिला रुग्णालयाची परवड होत आहे. सुरुवातीला महिला रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या जागी बांधण्यात येणार होते. तेथे वृक्षतोड नको म्हणून पर्यावरणाचे हित बघता जागा नामंजूर केली. नंतर टागोरनगर व वडाळागावाच्या जागेला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला. सध्याची प्रस्तावित टाकळी रोडवरील जागा दूर असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होईल, अशी भीती दाखविण्यात येत असून, भाभानगर येथील जागेस माजी आमदारांचा आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याचे भासविले जात असल्याने शासनाचा २४ कोटी रुपये निधी पडून आहे. त्यामुळे महिला रुग्णालयासाठी सिडकोतील पेलिकन पार्कची जागा उचित पर्याय ठरेल. राजकीय वादात महिला रुग्णालयाचा बळी जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन देतेवेळी शहराध्यक्षा अनिता भामरे, मनीषा हिरे, रजनी चौरसिया, मीनाक्षी चव्हाण उपस्थित होत्या.