अॅट्रॉसिटीवर राजच प्रथम बोलले
By admin | Published: September 27, 2016 11:57 PM2016-09-27T23:57:57+5:302016-09-27T23:58:23+5:30
बाळा नांदगावकर यांचा दावा
नाशिक : मराठा समाजाचे अशा प्रकारचे मोर्चे निघतील हे राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीच भाकीत केले होते, इतकेच नव्हे तर कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर सर्वप्रथम तेथे भेट देताना राज यांनी अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाविषयी धाडसाने विधान केले होते, असे विधान कधी बाळासाहेबांनीही (ठाकरे) केले नव्हते, असा दावा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. राज ठाकरे यांच्या सर्व सभांचे नियोजन मी करतो. दोन वर्षांपूर्वी सोलापूर येथे जाहीर सभेत राज यांनी मराठा समाजाची अवस्था बघूून आता राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघतील, असे सांगितले होते. तेथून परतल्यानंतरदेखील त्यांनी एका खासगी वाहिनीशी बोलतानाही त्याची पुनरावृत्ती केली होती, असे ते म्हणाले. राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, मुंबईत हा मोर्चा झाल्यानंतर राज पुन्हा बोलतील असे सांगून नांदगावकर म्हणाले की, राज्यातील सरकार राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंटमधील योजनाच कॉपी पेस्ट करीत आहेत. नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजनेत मनसेने सुचविलेल्याच योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले.
आम्ही कमी पडलो...
आगामी महापालिका निवडणुकींच्या कामासाठी मनसे कामाला लागली आहे. नाशिकमध्ये मनसेची अनेक कामे झाली आहेत, ती लोकांपर्यंत पोहचवण्यात कमी पडलो हे त्यांनी मान्य केले. राज्य सरकारच्या हट्टाग्रहामुळे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नगरसेवक अन्य पक्षांत जात असल्याचा दावाही त्यांनी केला.