राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:38 AM2019-10-13T00:38:37+5:302019-10-13T00:39:53+5:30

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

Raj Saheb, come to Nashik, see the pits ..! | राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

googlenewsNext
ठळक मुद्देकाळ बदलला; मनसेची सत्ता गेली, कुंभमेळा संपून झाली चार वर्षे

नाशिक : संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांची शनिवारी (दि.१२) मुंबईत सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेताना नेहमीप्रमाणेच नाशिकमधील संदर्भ दिला. राज्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. मात्र नाशिकमध्ये खड्डे नाहीत, असे अजब विधान त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील मनसेच्या कारभाराचादेखील हवाला दिला. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना ठेकेदारांना दम दिला होता त्यामुळे रस्ते चांगले झाल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यानंतर राज यांनी त्यावेळी राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने नाशिकमध्ये केलेली कामे दाखवताना गुळगुळीत रस्तेदेखील दाखवले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत आणि आत्तापर्यंत मोठा बदल झाला आहे. मात्र २०१२-२०१७ दरम्यानच्या सत्ता काळातून राज हे बाहेर पडण्यास तयार नसल्याचेच त्यांच्या विधानातून दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची भाजपाच्या मदतीने सत्ता होती. त्याचवेळी २०१४-१५ नाशिकमध्ये कुंभमेळा होता. महापालिकेने एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यात राज्य शासनाने ७० टक्के निधी दिला. त्यातून कुंभमेळ्याची कामे करता आली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी प्रवीण गेडाम हे कर्तव्य कठोर आयुक्त होते आणि त्यांनी तीन तीन वेळा प्रत्येक कामाचे आॅडिट केले आणि त्यानंतर देयके दिली गेली. २०१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राज
यांनी याच कुंभमेळ्याच्या कामांचा हवाला देऊन गुळगुळीत रिंगरोड दाखवले होते.
शनिवारी मुंबई येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने शहरातील त्यांच्या काळातील आणि
आताच्या खड्डयांचे चित्र नाशिककरांसमोर उभे ठाकले. ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून नाशिकमधील विकासकामांचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी सभांमध्ये नाशिकचा विकास मुद्दा पुन्हा समोर आल्याचे बोलले
जात आहे.
खड्ड्यांचे स्मरणरंजन
आता कुंभमेळा संपून चार वर्षे झाली असून, तीन वर्षे ठेकेदाराकडील दायित्व संपत नाही तोच खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली आहे. चालू वर्षी पाऊस संपूनही खड्डे जैसे थे असताना राज यांनी मनसेच्या काळातील स्मरण रंजनाच्या आठवणी आजच्या स्थितीत सांगितल्याने नाशिककरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: Raj Saheb, come to Nashik, see the pits ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.