राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:56 AM2019-08-15T00:56:01+5:302019-08-15T00:56:28+5:30

सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे.

 Raj shunned; Grandpa came, got stuck in lotus lid! | राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले!

राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले!

Next

नाशिक : सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे. कधी आघाडीबरोबर तर कधी विरोधात तर कधी निवडणूक लढायचीच नाही, असा अवघा गोंधळ आहे. अशावेळी शिलेदारांची कोंडी होणे स्वाभाविकच आहे. विशेषत: निवडणुकांसाठी बाहू स्फुरण पावणारे मग मल्लच असतील आणि त्यांचे शड्डू ठोकून झाले असेल तर मग काय करणार, लढायचेच ठरले तर आखाडा बदलणारच की!
पंचवटीकर ढिकले यांचेच बघा ना शड्डू ठोकले खरे, परंतु पक्षाची भूमिकाच कळेना. अखेरीस त्यांनी आखाडा बदलायचे ठरवले आणि वस्तादही. त्यामुळे त्यांच्या पोस्टर बॅनरवरून राज ठाकरे यांच्या छबीही अचानक हटल्या आणि तशी कुजबुजही सुरू झाली आहे.
सुरुवातीला सारेच अशा गोष्टींचा इन्कार करतात. तसे मराठी हृदयसम्राटांचे (सध्या तरी) शिलेदार असलेले राहुल ढिकले नाकारतीलही. हा राईचा पर्वत आहे, असे म्हणतील; परंतु राईचा पर्वत होण्यासाठी मुळातच राई म्हणजे असतेच ना...! तर सध्या अशाच प्रकारची चर्चा जोर धरत असून, राज ठाकरे यांच्या ज्या पद्धतीने निवडणूक न लढविण्याचे संकेत मिळत आहेत आणि भाजपा ज्या पद्धतीने अन्य पक्षांतील शिलेदार आपल्याकडे सामावून घेत आहेत, ते बघता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात बाळासाहेब काय म्हणतात आणि वसंतराव काय ‘गीत’ गातील हा पुन्हा वेगळा विषय... त्यातच (कै.) उत्तमराव ढिकले यांनीदेखील कोणत्याही पक्षाला जवळ करण्यास कधीच संकोच केला नाही तेथे राहुल यांनी तरी का तमा बाळगायची?
या मतदारसंघात तसे तर भाजपाचे विद्यमान उमेदवार बाळासाहेब सानप प्रमुख दावेदार आहेत. परंतु भाजपात काय होईल सांगता येत नाही. विशेषत: चंद्रकांतदादा पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि वातावरण बदलले गेले. दादांच्या आशीर्वादाने भाजपात अनेक बदल होऊ लागले आहेत आणि त्याच दादांच्या आशीर्वादाने अनेक बदल संभवत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच मग राहुल ढिकले यांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली.
मनसे म्हटले की नाशिक हे सात वर्षांपूर्वीचे समीकरण तसे केव्हाच संपले आहे. आजही हा पक्ष मोजक्याच हातांवर टिकून आहे. त्यात राहुल ढिकले यांचा समावेश आहे, परंतु राजकारणात महत्त्वाकांक्षेशिवाय नेते टिकत नाही. राहुल यांची सुप्त इच्छा कालांतराने उघड झाली आणि त्यांचे पिताश्री (कै.) उत्तमराव ढिकले यांनी ज्या पूर्व नाशिक मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले त्यावरच ढिकले यांनी दावा केला. विधानसभेच्या निवडणुका तशा तर जाहीर होण्यास अवकाश असतानाच राहुल ढिकले यांना घुमारे फुटले. त्यांच्या आणि राज यांच्या छबी असलेली पोस्टर्स पंचवटीतील रिक्षांवर दिसू लागली. परंतु गेल्या पंधरवड्यापासून अचानकच ढिकले यांच्या पोस्टरवरून राजकीय पितृतीर्थ गायब झाले आणि (कै.) उत्तमदादा ढिकले यांच्या आशीर्वादाचे फलक दिसू लागले. आता चंद्रकांत दादांच्या छबी कधी दिसतील, अशीदेखील कुजबुज सध्या सुरू आहे.

Web Title:  Raj shunned; Grandpa came, got stuck in lotus lid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.