राज यांनी जाणल्या गारपीटग्रस्तांच्या व्यथा शेतकऱ्यांशी चर्चा : मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करणार
By admin | Published: December 15, 2014 01:51 AM2014-12-15T01:51:42+5:302014-12-15T01:56:16+5:30
राज यांनी जाणल्या गारपीटग्रस्तांच्या व्यथा शेतकऱ्यांशी चर्चा : मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करणार
नाशिक - अवकाळी पावसासह गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्'ातील निफाड तालुक्यातील काही भागांचा दौरा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आत्महत्त्या हा काही पर्याय नसून त्याने प्रश्न सुटणार नाहीत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू, अशी ग्वाही यावेळी राज ठाकरे यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी जिल्'ातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. निफाडकडे जाणाऱ्या रस्त्यात मध्येच थांबत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारकडे तुमचे गाऱ्हाणे मांडतो, असे आश्वासनही दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी धारणगाव येथील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुई येथे राज ठाकरे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना गराडा घातला. रुई गावातील शेतकऱ्यांनी तर चिता रचत त्यावर बसून संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले, आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या; परंतु प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा पर्याय स्वीकारू नये. आता शेतकऱ्यांना लढा देण्याची नव्हे तर धीर देण्याची गरज आहे.