पोतडीतल्या गोष्टी निवडणुकीच्या वेळी बाहेर काढू- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:18 PM2018-12-20T13:18:08+5:302018-12-20T13:20:48+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या नाशिक दौऱ्यात त्यांनी येत्या निवडणुकांवरही भाष्य केलं आहे.
नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या नाशिक दौऱ्यात त्यांनी येत्या निवडणुकांवरही भाष्य केलं आहे. पोतडीतल्या गोष्टी निवडणुकीच्या वेळी बाहेर काढू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा, इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध झाला पाहिजे. या लोकांना निवेदनाच्या भाषा कळत नाही. सरकारनं क्विंटलला 200 रुपये भाव जाहीर केला असला तरी मी समाधानी नाही. मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यासंदर्भात चर्चा करणार आहे. वेळ आल्यावर सविस्तर बोलेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी बुधवारी (दि. 19) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही युतीच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला. कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुंबईला येण्याचे आमंत्रण
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कळवण तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादकांना मुंबई येथे आमंत्रित केले. कांदा प्रश्न नेमका काय आहे, याचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. कांदा प्रश्नावर प्रगतिशील शेतकरी मधुकर पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मुरलीधर पगार, राकेश पाटील, पंडित वाघ ,पांडुरंग पगार यांनी चर्चा केली.
शेतकरीप्रश्नी आंदोलन
शेतकरी साथ देतील तर मनसे रस्त्यावर उतरतील, असे सांगत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचेही स्पष्ट केले.पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करतील त्यात तुम्ही सहभागी होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना केला.