राज ठाकरे-बाबासाहेब पुरंदरे पाहणी दौरा : जीव्हीके कंपनीमार्फत प्रकल्पाला सहाय्य
By admin | Published: March 11, 2016 11:08 PM2016-03-11T23:08:43+5:302016-03-11T23:59:13+5:30
शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय
नाशिक : महापालिकेच्या वतीने गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशनमधील जागेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रही असलेल्या शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय जी.व्ही.के. कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून साकार होणार असून, डिसेंबरअखेर वस्तुसंग्रहालय पूर्णत्वाला जाणार असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज ठाकरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंपिंग स्टेशनमधील जागेची पाहणी केली आणि कंपनीचे प्रतिनिधी व वास्तुविशारद यांच्याशी चर्चा केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा शुक्रवारी अचानक नाशिक दौरा निश्चित झाला. त्यानुसार सकाळी १० वाजताच त्यांचे नाशिकला आगमन झाले. निवडक पदाधिकाऱ्यांशिवाय त्यांच्या स्वागताला कुणी नव्हते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शुक्रवारी नियोजित नाशिक दौरा असल्याने राज यांनाही त्यांनी बोलावून घेतल्याचे आणि प्रस्तावित वस्तुसंग्रहालयाच्या कामाबाबत चर्चा करण्याचा निर्णय झाल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, दुपारपर्यंत राज यांनी शहरातील काही वास्तुविशारदांसमवेत चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पंपिंग स्टेशनमधील जागेची पाहणी केली. सदर जागेतील सभागृह, उद्यान, प्रवेशद्वारे यांची माहिती यावेळी घेण्यात आली. मध्यवर्ती जागेत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याबाबत तसेच प्रवेशद्वारावरच दर्शनी भागात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत चर्चा झाली. तसेच पुढचे दरवाजे प्रवेश आणि मागच्या दरवाजाने बाहेर जाण्याचा मार्ग करण्यासंबंधीही चर्चा झाली.