राज ठाकरे मिशन महापालिकेसाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:55 AM2021-07-17T00:55:26+5:302021-07-17T00:56:32+5:30
सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी आरंभली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे त्यासाठी शुक्रवारी (दि.१६) नाशकात आगमन झाले. दोन दिवस पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांशी राज हे चर्चा करणार आहेत. तसेच त्यातून पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
नाशिक : सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी आरंभली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे त्यासाठी शुक्रवारी (दि.१६) नाशकात आगमन झाले. दोन दिवस पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांशी राज हे चर्चा करणार आहेत. तसेच त्यातून पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (दि. १६) दोन दिवसीय दौऱ्यासाठी त्यांचे मुंबईहून नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांचे डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, अंकुश पवार यांनी स्वागत केले. यावेळी मनोज घोडके, संदीप भंवर, निखिल सरपोतदार, पराग शिंत्रे आदी उपस्थित होते.
राज ठाकरे उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होत असून, त्यामुळे पक्षाने तयारी सुरू केली. त्यादृष्टिकोनातून हा दौरा महत्त्वाचा असला तरी पक्षातील गटबाजीदेखील थोपवावी लागण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पक्षातील तरुणतुर्कांचे एक शिष्टमंडळदेखील त्यांना भेटून आले. त्यानंतरदेखील पक्षात कुरबुरी सुरूच आहेत. राज यांच्या नियोजित दौऱ्याची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी राज यांच्या दौऱ्यात तक्रारी न करता संघटन मजबूत करण्याबाबतच चर्चा करा, असा सल्ला पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचे समजते.