नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात

By संकेत शुक्ला | Published: February 1, 2024 04:38 PM2024-02-01T16:38:51+5:302024-02-01T16:39:18+5:30

दोन दिवसांचा दौरा : कार्यकर्ता शिबिरात घेतला कामकाजाचा आढावा

Raj Thackeray ground to win Nashik again | नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात

नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात

नाशिक : शाखाप्रमुख म्हणून तुमचे कामकाज कसे असावे... तालुकास्तरावर काम करताना तुमचा आवाका काय हवा... जिल्हास्तरावरून कामकाजाचे नियोजन कसे हवे, याबरोबरच नाशिककरांनी मनसेला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा, राजकीय भांडणात आपल्याला संधी आहे, पुन्हा एकदा नाशिक जिंकण्यासाठी कामाला लागा, असे डोस मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. विशेष म्हणजे एरवी माध्यमांसमोर बिनधास्त बोलणाऱ्या ठाकरे यांनी मेळाव्यात मात्र माध्यमांना दूर सारत बंद दाराआड हे डोस दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये ‘हॉटेल एक्स्प्रेस इन’ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुवारी दुपारी ढोल-ताशांच्या गजरात राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, रोहन देशपांडे, सुजाता डेरे, स्वागता उपासणी, सत्यम खंडाळे यांसह पदाधिकारी उपस्थित होेते. पहिल्या टप्प्यात राज यांनी शहरातील शाखाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. शेवटी जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी व्यूहरचना कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले.
 
अमित ठाकरे घालणार नाशिकमध्ये लक्ष
मनसेवर नाशिककरांनी विश्वास दाखवला आहे. सन २०१२ ते १७ या कालावधीत मनसेने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. याच नाशिकमधून त्यांना तीन आमदारही मिळाले होते. ‘विकासाची ब्लू प्रिंट’ म्हणून नाशिकचा उल्लेख राज यांनी ठिकठिकाणी केला आहे. नाशिककर आपल्याला साथ देतात हा विश्वास राज यांना असल्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांना नाशिकमध्ये विशेष जबाबदारी सोपविल्याची चर्चा होती.

Web Title: Raj Thackeray ground to win Nashik again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.