राज ठाकरेंनी जमिनीवर बसून साधला कार्यकर्त्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 09:21 AM2017-11-10T09:21:27+5:302017-11-10T09:23:57+5:30
पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असून यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला बळ देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु केले असून, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मुंबईत सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी जोमाने प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची भेट घेत आहेत. दरम्यान नाशिक दौ-यावर असताना राज ठाकरे यांनी थेट जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे.
पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असून यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे साधारण आठ महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी जमिनीवर बसूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधणं पसंद केलं.
नाशिक: मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र सैनिकांसोबत आपलेपणाने खाली जमिनीवर बसून थेट संवाद साधताना #RajThackeray#mns#Nashikpic.twitter.com/DPlwc5HEAg
— MNS Tweets (@manaseit) November 9, 2017
राज ठाकरे नाशिक दौ-यावर आले असून यावेळी ते समृद्धी महामार्गबाधित शेतक-यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. कल्याण, शहापूर, इगतपुरीचे शेतकरी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेतील.
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचे नाशिक शहरात शहरात आगमन होताच सर्वप्रथम साहेबांचा महाराष्ट्र सैनिकांसोबत आपलेपणाने थेट खाली जमिनीवर बसून संवाद #RajThackeray#mns#Nashikpic.twitter.com/fo1A5O3MuH
— MNS Tweets (@manaseit) November 9, 2017
ठाण्यात 18 नोव्हेंबरला राज'गर्जना'
राज ठाकरे यांची येत्या 18 नोव्हेंबरला शनिवारी ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून राज ठाकरे फेरीवाल्यांसह राज्यासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करतील. सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी मनसेने फेरीवाल्यांचे सामना उलथवून लावत पिटाळून लावले. त्यामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवालाविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीरसभाही ठाण्यामध्येच होणार आहे. राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथ अडवून ठेवल्याने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हटवले.
फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर एक-दोन दिवस रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा दिसला. पण आता पुन्हा पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता कुठली भूमिका घेतात याची उत्सुक्ता आहे. महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी कमालीची उत्सुक्ता आहे. राज ठाकरे शिवसेनेबद्दल काय बोलणार याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष असेल.