...म्हणून राज ठाकरेंना मोदीद्वेषाने पछाडलं; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'राज की बात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:05 PM2019-04-27T13:05:36+5:302019-04-27T13:13:57+5:30
नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले असल्याचा घणाघात फडणवीस यांनी आपल्या अखेरच्या सभेत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर केला.
नाशिक : नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार होते, याचा विसर त्यांना पडला. या सरकारने त्यांच्या विनंतीवरून पैसा पुरविला, त्यामुळे मनसेचे इंजिन नाशकात सुरळीत चालू शकले, असा खुलासाही फडणवीस यांनी सभेत बोलताना केला.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचारतोफा शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. तत्पुर्वी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे व आघाडी सरकारवर फडणवीस यांनी आपली अखेरच्या सभेतून तोफ डागली.
राज ठाकरे यांनी याच मैदानावर शुक्रवारी रात्री सभा घेऊन भाजपा सरकार व दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. मनसे काळात नाशिक शहरात झालेल्या विकासकामांची ‘झलक’ व्हिडिओतून दाखविली. त्यांचे दावे खोडताना शनिवारी सकाळी फडणवीस यांनी बोलताना सांगितले, राज ठाकरे यांच्या मनसेची महापालिकेत सत्ता होती, तेव्हा राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार होते, या सरकारने मनपाला पैसा पुरविला म्हणून मनसेचे इंजिन सुरळीत चालू शकले आणि विकासकामे त्यांना करता आली; मात्र त्याचे सर्व श्रेय ठाकरे आता घेत आहेत. राहिला प्रश्न नाशिकच्या विकासाचा तर नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सध्या २ हजार कोटींची कामे सुरू आहेत; मात्र मोदीद्वेषाने डोळ्यांवर झापडे पडल्यामुळे ठाकरे यांना ती विकासकामे दिसणार नाहीत. जशी सायकल, मोटारसायकल भाडे तत्वावर मिळते, अगदी तसेच शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ‘इंजिन’ भाड्याने घेतले असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.
फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
* आगे आगे देखो होता हैं क्या, राज ठाकरे यांना सुचक उत्तर.
* मोदीद्वेषाने राज ठाकरे यांना पछाडले.
* शरद पवार यांनी भाड्याने घेतलेले इंजिन केवळ तोंडाच्या वाफेवर चालणारे.
* तोंडाच्या वाफेवर चालणारे इंजिन दिल्लीपर्यंत कधीही पोहचू शकणार नाही.
* नाशिकमध्ये २ हजार कोटींची विकासकामे सुरू
* जनतेचा पैसा लुटला म्हणून यापुर्वीच्या ‘पालका’ने तुरूंगवास भोगला.
* मनसेच्या सत्ताकाळात पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी पुरविला.