राज मला म्हणाले, परप्रांतियांबाबतच्या भूमिकेबाबत ‘मिसइंटरप्रिटेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:42+5:302021-07-19T04:11:42+5:30
नाशिक : राज ठाकरे यांची आणि माझी शनिवारी काही वेळासाठी भेट झाली. तेवढ्याशा भेटीत काही आघाडीबाबतची चर्चा होऊ शकत ...
नाशिक : राज ठाकरे यांची आणि माझी शनिवारी काही वेळासाठी भेट झाली. तेवढ्याशा भेटीत काही आघाडीबाबतची चर्चा होऊ शकत नसते. मात्र, राज मला म्हणाले, की प्रत्येकवेळी तुम्ही माझ्याबाबत चांगले बोलता. पण परप्रांतियांबाबतची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत आघाडीचा विचार नाही, असे म्हणता. खरेतर माझ्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेबाबत काही तरी ‘मिसइंटरप्रिटेशन’ (विपर्यास) केले जात असल्याने तुमचा गैरसमज झाला असावा, असे ठाकरे सकाळी म्हणाल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नाशिक महापालिका निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर उतरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शनिवारी भेट झाली. हा भेटीचा ‘राज योग’ जुळून आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी त्या भेटीत काय झाले ? त्याचा खुलासा केला. या विषयाबाबत बोलताना प्रारंभी पाटील यांनी आम्ही केवळ हवापाण्याच्या गप्पा मारल्या, असे सांगितले. मात्र, त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा त्याच प्रश्नावर छेडले असता राज यांनी मी त्यांची नेहमी स्तुती करतो, त्याबाबत माझे आभार मानले. पण त्यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेबाबत माझा काहीतरी गैरसमज झाला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी पाहिजे असल्यास मी माझ्या परप्रांतियांबाबत केलेल्या भाषणाच्या लिंक तुम्हाला पाठवून देतो, असेही ते म्हणाले. त्यावर मी राज यांना सांगितले, की त्या लिंक पाठवा. मीदेखील पाहतो आणि गरजेनुसार पुढे वरिष्ठांना पाठवतो, इतकाच आमच्यात राजकीय संवाद झाल्याचेही पाटील यांनी नमूद केले. राज्यात महाआघाडी सरकार असल्यामुळे राज ठाकरे यांची विरोधी पक्ष असलेल्या भाजपाबरोबर युती होईल, अशी चर्चा असल्याने मुंबई आणि नाशिक, पुणे, ठाणे महापालिकेत अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज यांचा चेहरा आश्वासक असल्याने महाराष्ट्राला त्यांच्यासारखे नेतृत्व हवे असल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत ते परप्रांतियांबाबतची चुकीची भूमिका सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी युती शक्यच नसल्याचे सांगितले.
इन्फो
... तर विचार होऊ शकतो
सध्यादेखील राज्यात भाजपाची रासप, रयत संघटना, शिवसंग्राम, रिपाइं यांसाख्या विविध पक्षांशी युती आहे. त्याप्रमाणेच परप्रांतियांबाबतचे धोरण त्यांनी बदलले तर विचार होऊ शकतो, असे सांगून या युतीबाबत काही विचार होऊ शकतो, असे सांगत पाटील यांनी थोड्याफार प्रमाणात शक्यता असल्याचेच संकेत दिले. तसेच या विषयाबाबत आमच्या पक्षसंघटनेत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, हेदेखील पाटील यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर जिल्हा प्रभारी जयकुमार रावळ, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, प्रशांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
कुणाचीच नाराजी नाही
एका कुटुंबातही मतभेद असतात, त्याप्रमाणेच कुणाचे मतभेद असू शकतात. मात्र, कुणाही नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. गिरीश महाजन संपूर्ण राज्याचे नेते असून, ते अन्य सर्व मनपाप्रमाणेच नाशिकलादेखील मार्गदर्शन करू शकतात. त्यात वाद नसल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकांमध्ये जुन्या - नव्यांचे बॅलन्स सांभाळणे अवघड काम असते. मात्र, भाजप ते सांभाळण्याचा प्रयत्न करते.
इन्फो
राज्याचा प्रश्न केंद्राच्या दोन नेत्यांकडे
राज्य शासनाच्या वाटचालीत, ध्येयधोरणात खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. कधी मोदींना उद्धव भेटतात, कधी मोदींना पवार भेटतात, कधी आणखी कुणी त्यामुळे मीदेखील गोंधळून गेलो आहे. हा प्रश्नच खूप मोठा असल्याने त्याची जबाबदारी केंद्रातील दोन नेत्यांकडे सोपविण्यात आली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील साखर कारखान्यांना मोदींच्या कार्यकाळात पॅकेज देऊन मदतच करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच केंद्राचे सहकार खाते सहकार क्षेत्राला पूरकच ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
राज्याने कर कमी करावा, मी केंद्राला सांगतो
डिझेल, पेट्रोलवर केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणचा कर लागतो. मात्र, केंद्राच्या करामध्ये त्या क्रुड ऑईलचे प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन यांचे कमिशन असते. तर राज्याचा कर हा सर्वच्या सर्व राज्याच्या खिशात जातो, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. तसेच राज्याने १० रुपयांनी कर कमी केल्यास मी केंद्राशीदेखील बोलेन, असेही पाटील यांनी नमूद केले.
-------------------
फोटो (१८पाटील-राज)
शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या भेटीप्रसंगी मनसे नेते राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.