राजाभाऊ वाजे : आढावा बैठकीत लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

By admin | Published: February 12, 2016 10:53 PM2016-02-12T22:53:40+5:302016-02-12T22:53:53+5:30

३१ बंधाऱ्यांतील गाळ काढणार

Rajabhau said: Appeal to increase people participation in the review meeting | राजाभाऊ वाजे : आढावा बैठकीत लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

राजाभाऊ वाजे : आढावा बैठकीत लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन

Next

 सिन्नर : लघु पाटबंधारे विभाग तालुक्यातील ३१ गावांमधील बंधाऱ्यांतील गाळ काढणार असून, त्यासाठी मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत. लोकसहभाग वाढवून बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणीसाठा वाढवून घेण्याचे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातून पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम, उदय सांगळे, वसंत उघडे, अलका पवार, सोनाली कर्डक, सहायक गटविकास अधिकारी मधुकर वाघ, उपअभियंता एस. व्ही. बोरोले, विजय काटे, विजय इंगळे, टी.जे. राजवाडे, एन. पी. देशमुख आदि उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी व डिझेल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती उपअभियंता विजय इंगळे यांनी दिली. तथापि, गुरुवारी मशीन उपलब्ध झाल्यानंतर गाळ वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी आमदार वाजे यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. मशीन व डिझेल उपलब्ध झाले असून, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग असलेल्या ३१ गावांनी या संधीचा फायदा करून घेण्याच्े आवाहन वाजे यांनी केले.
ज्या गावांची लोकसहभाग देऊन बंधाऱ्यातून काढलेला गाळ उपसण्याची तयारी असेल अशा गावांना मशीन पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पिंपरवाडी येथून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ होणार असून, त्यानंतर पाथरे बुद्रूक येथे काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी वाद न करता ट्रॅक्टर लावून गाळ वाहून न्यावा, मशीन बंद राहणार नाही व वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे वाजे यांनी सांगितले. ज्या गावात काम सुरू झाले ते पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या गावात मशीन पाठविण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतून कामे करण्यासाठी २५ टक्के लोकसहभाग आवश्यक असून, प्रशासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन वाजे यांनी केले.
बैठकीस उपस्थितीत असलेल्या गावांपैकी सुमारे १६ गावांच्या सरपंचांनी तातडीने लोकसहभाग देऊन ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेण्यास तयार असल्याचे सांगून मशीन आपल्या गावांना पाठविण्याची विनंती केली. ३१ पैकी काही गावांचे सरपंच बैठकीस अनुपस्थित होते. घोटेवाडी व कासारवाडी येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यातील गाळ काढण्यास असहमती दर्शविली.

Web Title: Rajabhau said: Appeal to increase people participation in the review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.