राजापूरला खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:03 PM2019-04-01T18:03:37+5:302019-04-01T18:04:02+5:30
राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्यामुळे तारा एकमेकांना चिकटल्या कीवीजपुरवठ्याला व्यत्यय येतो. बऱ्याच वेळा तारा तुटतात. पण त्या तारा जोडण्यासाठी कर्मचारी वेळवर हजर नसतात. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ३१ मार्च रोजी दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती संबंधित अभियंत्याला दिल्यांनतर वीजपुरवठा सुरू झाला. १ एप्रिल रोजी दोन तास वीजपुरवठा खंडित झाला. लहीत फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नसल्याने तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. कर्मचाऱ्यांअभावी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असून त्यात वारंवार खंडित वीजपुरवठ्याची भर पडत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थात संताप व्यक्त होत आहे. येथील गावठाण हद्दीतील शनीमंदिराजवळील रोहित्र नेहमी जळत असतात. त्यामुळे बºयाच वेळेस गावातील काही भाग अंधारात राहतो. त्यामुळे वीजपुरवठा कधी असतो तर कधी नसतो. याकडे अधिकाºयांनी लक्ष देऊन वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.