राजापूरला आढळला डेंग्यूचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 04:43 PM2019-11-27T16:43:58+5:302019-11-27T16:44:11+5:30
घबराट : गावात डासांचा वाढता उपद्रव
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथील एका युवकाला डेंग्यूची लागण झाली असून या रूग्णांवर येवला येथील साई सिद्धी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
राजापूर येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून गावात पावसामुळे मोठे गवत उगवलेले आहे. त्यामुळे डासाचे प्रमाण खूपच वाढले आहे. वाढत्या गवतामुळे घरादारात डासांचा उपद्रव वाढला आहे. डासांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून मेडिकलमधून डास निर्मुलन साहित्याला मागणी वाढली आहे. ग्रामपंचायतीने गवतावर तणनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. गावात नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे लाखो रु पये खर्च करून जनतेच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करण्यात आले मात्र हे केंद्र सुरू नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. सध्या या आरोग्य केंद्राचा कारभार येथील उपकेंद्रात तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. केंद्रात कधी कधी एकच डॉक्टर हजर असतात तर बऱ्याचदा ते गायब असतात. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीकडे आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी साहित्याची मागणी केली आहे. परंतु, अद्याप ग्रामपंचायतीने साहित्य न दिल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा सुरू होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. राजापूर येथील खासगी दवाखान्यांमध्ये थंडी-तापाने बेजार झालेले बरेच नागरिक उपचार घेत आहेत. त्यातच एका युवकाला डेंग्यूची लागण झाल्याने गावात घबराटीचे वातावरण आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे व तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.