राजापूरला पाण्यासह चारा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:37 PM2019-03-29T17:37:13+5:302019-03-29T17:37:25+5:30
ग्रामस्थ हैराण : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील भागात राजापूर परिसरात पाण्याबरोबरच चारा टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मार्च महिना संपत आला तरीही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यातील पूर्वेकडील भाग दुष्काळी जाहीर झालेला असतानाही शासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.
राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. याठिकाणी यावर्षीचारा टंचाईने पशूपालक संकटात सापडलेले असताना शासनाने अद्याप चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. चारा शिल्लक राहिला नसल्याने जनावरांना सोडून देण्याची वेळ आली आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. वाडयावस्त्यांवर विहिरींनी तळ गाठला आहे. टॅँकर सुरू असूनही वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवली जात नाही. अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती,भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाडयावस्त्यावर सध्या पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पाणीपुरवठा योजना रखडली
राजापूर येथे दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च मिहन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचाच आधार घ्यावा लागतो. आतापर्यंत गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन पाणी पुरवठा योजना राबवूनही त्या अयशस्वी ठरल्या आहेत. वडपाटी पाझर तलवात आजही पाणी आहे. तेथील योजना राबवून गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र तेथे वन विभागाने जाचक अटी लावल्याने राजापूर येथील पाणी पुरवठा योजना खोळंबली आहे.