‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:36 PM2018-10-13T23:36:20+5:302018-10-14T00:11:28+5:30
मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे.
नाशिकरोड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणीची परतीची वेळ बदलावी, दादरला थांबा देऊन प्रायोगिक तत्त्वावर गाडी चालवून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
नाशिककरांसाठी मुंबई-ठाणे आदि भागात दररोज ये-जा करण्यासाठी राज्यराणी, पंचवटी, गोदावरी या तीनच गाड्या आहेत. राज्यराणीला लासलगाव, निफाड व सर्वांत महत्त्वाचा दादर थांबा नाही. तसेच सीएसटीवरून येणारी राज्यराणीची वेळ चुकीची असल्याने तिला प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नांदेड-सीएसटी राज्यराणी करून तसे वेळापत्रक करण्याचा घाट घातला जात आहे.
तत्कालीन स्व. माजी खासदार डॉ. वसंत पवार यांनी नाशिककरांना मनमाड-सीएसटी तपोवन एक्स्प्रेस मिळवून दिली होती. काही वर्षे मनमाड-सीएसटी चाललेली तपोवन एक्स्प्रेस पुढे नांदेड-सीएसटी करण्यात आली. मध्य रेल्वेची वर्षभर चालणारी ही एकमेव गाडी असून नांदेडवरूनच भरून येणाऱ्या तपोवनमध्ये नाशिककरांची हक्काची तपोवन पाठोपाठ मनमाड-पुणे रेल्वे भुसावळ-पुणे करण्यात आली. आता रेल्वे प्रशासनाकडून नाशिककरांची हक्काची व गरजेची राज्यराणी पळविण्याचा घाट घातला जात आहे.
‘राज्यराणी’ची परतीची वेळच चुकीची
मनमाडवरून पहाटे ५.२५ ला सुटणारी राज्यराणी नाशिकला ६.१३ व सीएसटीला १०.०७ ला पोहचते. मात्र तिला येताना-जाताना लासलगाव, निफाड, दादर थांबा दिलेला नाही. राज्यराणी सायंकाळी सीएसटीवरून ६.४५, नाशिकला रात्री १०.१५ व मनमाडला रात्री ११.२५ ला पोहचते. सीएसटीवरून नाशिकला येण्यासाठी दुपारी ३ वाजता सेवाग्राम, ४.३० वाजता नंदीग्राम, ६.१५ ला पंचवटी, ६.४५ ला राज्यराणी, ७ वाजता विदर्भ आहे. मुंबईत व्यापाºयांची कामे ५ वाजेपर्यंत संपून जातात. तर शासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने पंचवटी व त्यापूर्वी असलेल्या रेल्वेंना येणाºया प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे राज्यराणीला येणारे प्रवासी जास्त शिल्लक राहत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. नंदीग्राम व पंचवटी या दोन गाड्यांमध्ये पावणेदोन तासांचा कालावधी असून, यामध्ये सीएसटीवरून राज्यराणी सोडल्यास तिचा खºया अर्थाने प्रवाशांना व पर्यायाने रेल्वेलादेखील फायदा होईल.
दादर महत्त्वाचे ठिकाण
नाशिकहून मुंबईला जाणारे बहुतांश प्रवासी हे दादरलाच उतरतात. अत्यंत कमी प्रवासी सीएसटीला उतरतात. दादरला उतरल्यावर प्रवाशांना पश्चिम रेल्वेलाइनवरील अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, चर्चगेट व हार्बर लाइनवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र राज्यराणीला दादर थांबा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.