मनमाडच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र अहिरे बिनविरोध
By Admin | Published: December 30, 2016 11:27 PM2016-12-30T23:27:29+5:302016-12-30T23:27:49+5:30
कार्यकर्त्यांचा जल्लोष : स्वीकृत सदस्यपदी महेश बोरसे, गंगाभाऊ त्रिभुवन, नाजिम शेख यांची निवड
मनमाड : पालिकेच्या नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्यासह नगरसेवकांनी येथील एकात्मता चौकात सामुदायिक शपथविधी घेऊन पदभार स्वीकारला. पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रिपाइंचे राजेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मनमाड पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-रिपाइंच्या युतीला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले असून, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या नेतृत्वाखाली २० नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गटनेतेपदी गणेश धात्रक यांची निवड केल्याचे पत्र सादर केले. याप्रमाणेच कॉँग्रेसच्या गटनेतेपदी रवींद्र घोडेस्वार, तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आज नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदासाठी रिपाइंचे राजेंद्र अहिरे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून प्रमोद पाचोरकर यांनी स्वाक्षरी केली. उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने राजेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्याने घोषित करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश बोरसे (शिवसेना), गंगाभाऊ त्रिभुवन (रिपाइं), नाजिम शेख (कॉँग्रेस) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
येथील एकात्मता चौकात सामुदायिक पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजाभाऊ देशमुख, अलताफ खान उपस्थित होते. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सर्वांना शपथ
दिली. जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, व्यापारी संघटनेच्या वतीने उद्योजक अजित सुराणा, मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. सुनील बागरेचा, विनय गरूड, गंगाभाऊ त्रिभुवन, संदीप देशपांडे मनोगत व्यक्त केले. विविध संघटना व संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रवीण नाईक, विनय अहेर, दिलीप भाबड, महेंद्र शिरसाठ, लियाकत शेख, डॉ. दौलतराव ठाकरे, संगीता पाटील, सविता गिडगे, राणी मिश्रा, कल्पना खोटरे, डॉ. अर्चना जाधव, सुरेखा मोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)