राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:01 PM2018-12-11T18:01:23+5:302018-12-11T18:01:25+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे. झाडाची भर न झाल्याने कापसाला दरवर्षी ५० ते ९० पर्यंत बोंडे लागून एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते तेथे यावर्षी १० ते २० बोंडे येऊन १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. यावर्षी उत्पन्न ३ ते ५ क्विंटलपर्यंत घटून फक्त चाराच हाती आला आहे. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडीचा जुगार खेळत पुन्हा एकदा नशीब आजमवण्याच्या प्रयत्न पाणीच नसल्याने फसला अन् उभा कांदा करपला.
आज हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून, जिकडे पाहावे तिकडे मोकळे रानमाळ दिसत आहे. अनेकांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नाही. परिसरातील गाव व वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा रब्बी हंगामाचा विषयच नाही.आता फक्त जून उजाडावा आणि धोधो पाऊस पडावा हीच आस नव्या हंगामासाठी राजापूरकरांना लागून आहे.
-बंधारे कोरडे, तर ७० टक्के विहिरी पावसाळ्यातही कोरड्या होत्या.
-पावसाळ्यात फक्त दोन सर्वसाधारण, तर सुमारे १८-२०
टक्के रब्बी पेरणी बोटावर मोजण्या इतकीच झाली.
-अनेक शेततळे वर्षभर रिकामे होते, तर आता ९७ टक्के तळे कोरडेठाक पडले आहेत.
उन्हाच्या तीव्रतेने शेततळ्यांचे कागद खराब होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजापूर हे येवला तालुक्याच्या पूर्वेकडील उंचावर असल्याने येथे दरवर्षी पाऊस पडूनही उत्पन्न निघते असे नाही. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळ हा दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. हरणे, मोर व अन्य वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागत आहे. डिसेंबरमध्येच अशी स्थिती असून,पुढील सहा ते सात महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंतित आहे.
==
राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतात. हे गाव उंचावर असल्याने येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे
-काशीनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर