नाराजांना ‘राज’चा धक्का
By admin | Published: November 4, 2014 11:53 PM2014-11-04T23:53:12+5:302014-11-04T23:53:32+5:30
राजीनामे मंजूर : मनसेला खिंडार
नाशिक : कौटुंबिक व वैयक्तिक कारणावरून पक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या नाराजांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच धक्का दिला असून, ज्यांनी ज्यांनी राजीनामे पाठविले अशा सर्वांचे राजीनामे मंजूर करीत असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यातून पक्षाला खिंडार पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
माजी आमदार प्रवीण दरेकर यांनीही पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा गेल्या आठवड्यात सादर केल्यानंतर त्यापाठोपाठ नाशकातून माजी आमदार व सरचिटणीस वसंत गिते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, प्रकाश दायमा यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे पदांचे राजीनामे पाठवून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.राजीनामा देण्यामागे या सर्वांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणे दिल्यामुळे सदरचे राजीनामे नाराजीतूनच दिले गेल्याचा सरळ सरळ अर्थ काढण्यात येत होता. त्यामागे पक्षावर दबावतंत्र वापरण्याचा हेतूही संबंधितांचा असण्याची शक्यता नाकारली जात नव्हती. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. अखेर राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून राजीनामा पाठवून पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करीत असल्याचे म्हटले आहे. अशावेळी कोण आपल्या पाठीशी उभे आहे हे कळण्यास मदत होईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्यामुळे नजीकच्या काळात राज ठाकरे यांची वक्रदृष्टी आपल्याकडे वळवून घेण्यास कोणी धजावणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यातही ज्यांनी पदाचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले, ते स्वीकारले गेल्याने आता मनसेला खिंडार पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.