राकेश वानखेडेंची 'पुरोगामी' कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:32+5:302021-07-04T04:10:32+5:30
नाशिक : नाशिक येथील रहिवासी तथा आदिवासीपाड्यावर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे, राकेश वानखेडे यांची २०१५ मध्ये प्रकाशित झालेली ...
नाशिक : नाशिक येथील रहिवासी तथा आदिवासीपाड्यावर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे, राकेश वानखेडे यांची २०१५ मध्ये प्रकाशित झालेली बहुचर्चित 'पुरोगामी' कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे.
डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीने आंबेडकर आणि मार्क्स हे समन्वयाचे राजकीय सूत्र अधोरेखित केले आहे. ही कादंबरी आंबेडकरी विचार आणि राजकारण यांच्या प्रदीर्घ पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. दलित पँथर ते आजचे राजकीय वास्तव यापर्यंत ती वाचकांस वैचारिक प्रवास घडवते. सजग सामाजिक आणि राजकीय भान देणारी कादंबरी म्हणून वाचकांनी तिला पूर्वीच मान्यता दिली आहे.
मुंबई या नामांकित प्रकाशन संस्थेद्वारे काढलेल्या या कादंबरीने मांडलेल्या समन्वय सूत्राचा विचार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्थांच्या पुढाकाराने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कादंबरीस यापूर्वी अत्यंत मानाचे समजले जाणारे भास्करराव जाधव स्मृती पुरस्कार, नारायण सुर्वे उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार, सावाना नाशिक यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी विशेष सन्मान तसेच दीनबंधू मुकुंदराव पाटील पुरस्कार, कादवा शिवार पुरस्कार यासारखे २५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळवले आहेत. 'पुन्हा शंबूक' या कादंबरीनंतर राकेश वानखेडे यांचा सुरू झालेला हा प्रवास 'पुरोगामी'च्या यशानंतर आगामी 'गिनीपिग' या नुकत्याच प्रकाशित होऊ घातलेल्या कादंबरीपर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या ते प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्रचे महासचिव म्हणून काम पाहतात. त्यांच्या या तिन्ही कादंबऱ्या अत्यंत लक्षवेधी ठरल्या आहेत.
इन्फो
तब्बल १८ वर्षांनंतर
बाबुराव बागुल यांची कादंबरी 'सूड' ही २००३ साली मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल अठरा वर्षांनंतर नाशिकच्या लेखकाची साहित्यकृती अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आली आहे. वानखेडे यांची पुरोगामी कादंबरी यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या स्वायत्त अभ्यासक्रमासाठी होती. आता ती मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे.
फोटो
०३वानखेडे