राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:11 AM2019-08-15T01:11:21+5:302019-08-15T01:11:53+5:30
पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही.
नाशिक : पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. तर काहींच्या माहेरच्या घराचे बरेच नुकसान झाल्याने तिथे अजूनही घरांची साफसफाई आणि डागडुजीच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला तिकडे जाणेच शक्य न झाल्याने नेहमीप्रमाणे रक्षाबंधनाला भावाला राखी बांधता येणार नसल्याची खंत नाशिकच्या अनेक भगिनींना वाटत आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिघात आलेल्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक घरांची वाताहत तर कुणाच्या घरांची पडझड झाली. त्याशिवाय आॅगस्टच्या प्रारंभापासून त्या भागात वाहने जाणेच ठप्प झाले. तसेच टपाल खात्याने पाठवलेले पत्र, कुरिअरमार्फत पाठवलेल्या राख्यादेखील पोहोचू शकल्या नसल्याचे नाशिकमधील भगिनींनी सांगितले. त्यामुळे यंदा आम्ही केवळ मोबाइलवर बोलूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करणार असल्याची भावनादेखील कोल्हापूर किंवा सांगलीत माहेर आणि नाशिकला सासर किंवा कुटुंबासह निवास करीत असलेल्या भगिनींनी बोलून दाखवली.
दरवर्षी रक्षाबंधनाला मी माहेरी जाऊन सण साजरा करते. मात्र, यंदा पुराच्या घटनेमुळे रक्षाबंधनाला माहेरी जाऊन भावाला राखी बांधता आली नाही. तसेच आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह सगळ्यांनी मिळून सण साजरा करण्याच्या आनंदालादेखील मुकले आहे. त्यांना पाठवलेली राखीदेखील पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी भावाशी मोबाइलवर बोलूनच यंदाच्या रक्षाबंधनात समाधान मानावे लागेल.
- अनुराधा किरण जाधव, कडेगाव
मी मूळची सांगलीची असले तरी आमचे घर पुराच्या टप्प्यापासून थोडेसे दूर होते. त्यामुळे मीच आठवडाभर सांगलीत राहून माझ्या माहेरच्या घरातून पूरग्रस्तांची सेवा केली. त्यांना आमच्या युवा मंचच्या वतीने धान्य, जेवण, कपडे पुरवण्याचे कार्य करीत होते. मात्र, आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तिकडेच राहिल्याने परवाच नाशिकला परतले. मला सख्खा भाऊ नाही. पण दरवर्षी गावातील अन्य भावांना राखी बांधते. ते यंदा शक्य नसल्याची खंत आहे.
- सोनिया होळकर, सांगली
मनाची प्रचंड घालमेल सुरू आहे. अथक प्रयत्नांनंतर माझी राखी एका कुरियर कंपनीने पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, मात्र ती राखी रक्षाबंधनाला भावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचेही सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा कोल्हापूरस्थित भावाला राखी मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा होईल. आम्हा दोघी बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ आहे, मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला दोघींची राखी पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे फोनवरच भावाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहे.
- पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त नाशिक
पोलीस दलात असल्यामुळे मी यापूर्वी कुरियरनेच सांगलीस्थित भावाकडे राखी पाठवत असायचे. यावर्षी पूरपरिस्थितीमुळे तो पर्यायही बंद झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण हतबल आहोत, त्यामुळे भावनांना आवर घालत भावाला फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधावा लागणार आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते मानले जाते. त्यामुळे मनात कुठेतरी सल जाणवत आहे.
- शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
मी मागील २८ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. दरवर्षी भावाला कुरियरद्वारे राखी पाठवत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये राहणाºया भावाकडे राखी पाठविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावताना भावनांना आवर घालण्याचा धडा मिळालेला आहे. कोल्हापूरस्थित माझ्या काही मैत्रिणींशी मी संपर्क साधला असून, त्या माझ्या वतीने राखी खरेदी करून भावापर्यंत पोहोचविणार आहे.
- नम्रता देसाई,
पोलीस निरीक्षक, नाशिक