रक्षाबंधन सणासाठी राख्यांनी बाजारपेठा सजल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:19+5:302021-08-21T04:18:19+5:30
------------------------------------------------------------ ▪️सणावर महागाईसह कोरोनाचे सावट : खरेदीसाठी महिलावर्गांची गर्दी सणावर महागाईसह कोरोनाचे सावट : खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी देवगांव : ...
------------------------------------------------------------
▪️सणावर महागाईसह कोरोनाचे सावट : खरेदीसाठी महिलावर्गांची गर्दी
सणावर महागाईसह कोरोनाचे सावट : खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी
देवगांव : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारपेठांत निरनिराळ्या, रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. रक्षाबंधन सणासाठी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी मुलींसह महिलावर्ग बाजारपेठेत राख्या खरेदी करताना दिसत आहेत.
श्रावणातील दुसरा महत्त्वाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकाच दिवशी म्हणजे येत्या रविवारी साजरा करण्यात येणार आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक रक्षाबंधन असल्याने राखी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. मात्र, यंदाही कोरोनामुळे राख्यांनाही महागाईची झळ बसली आहे. त्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल, त्र्यंबकेश्वर या मोठ्या बाजारपेठा आहेत. तसेच देवगाव परिसरातील नागरिकांना घोटी, खोडाळा बाजारपेठ सोईस्कर ठरते. खेड्याखेड्यात, गावागावांतील दुकाने राख्यांनी सजली असून महिला राखी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. नेहमीप्रमाणे बाजारातील दुकानांमध्ये नवनवीन डिझाईनच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने आपले बस्तान बसविल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा आलेख चढता-उतरता असल्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे. मात्र, आता या संसर्गजन्य आजाराची दुसरी लाट ओसरू लागली असून, सरकारने निर्बंधही शिथिल केले आहेत. या सावटाखाली रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. यंदाही रक्षाबंधनावर कोरोनासह महागाईचे सावट असून बाजारपेठांत रुद्राक्ष, मेटॅलिक, डायमंड नेकलेस, धागा, गोंडा ब्रेसलेट, सिल्व्हर, मनी, छोटा भीम आदी नवीन लूकच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. विविध प्रकारातील राख्यांना ग्राहकांची मुख्यतः तरुण मुलींची, महिलांची पसंती आहे. या राख्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. बाजारामध्ये विविध प्रकारच्या आणि विविध आकारातील राख्या उपलब्ध झाल्या आहेत.
-----------------
कार्टून राख्यांचे आकर्षण
लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टून राख्यांच्या यात प्रामुख्याने समावेश आहे. राख्या २० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच विविध प्रकारच्या आकर्षक राख्याही ठेवण्यात आल्या असून, १० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत राख्यांनी किंमत पाहायला मिळते. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवेळी साधारणपणे महिनाभर आधीच खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असतात. मात्र, यावर्षी व्यवसाय थंड असल्याची प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून मिळत आहे. (२० देवगाव)
200821\20nsk_5_20082021_13.jpg
२० देवगाव