देशबांधवांचे संरक्षण हेच रक्षाबंधन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:53 AM2017-08-07T00:53:21+5:302017-08-07T00:53:27+5:30
बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण देशभरात उत्साहात साजरा होत असताना सैन्यात कार्यरत असणारे सैनिक आणि त्यांच्या बहिणींना मात्र पत्र आणि फोनद्वारेच समाधान मानावे लागते.
नाशिक : बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण देशभरात उत्साहात साजरा होत असताना सैन्यात कार्यरत असणारे सैनिक आणि त्यांच्या बहिणींना मात्र पत्र आणि फोनद्वारेच समाधान मानावे लागते. वर्षभरातील या महत्त्वाच्या सणांना तरी भावाला ओवाळता यावे, सूख-दु:खाच्या गोष्टी करता याव्यात असे वाटत असले तरी देशसेवेत जिवाची बाजी लावणाºया या भावांच्या कर्तृत्वाचे कौतुक करीत बहिणी आपला भाऊ सुटीवर आल्यानंतर सणांची भरपाई करत आहेत. अशा सैनिक भावांशी आणि त्यांच्या बहिणींशी संवाद साधला असता निरनिराळे पैलू समोर आले.
माझा भाऊ सैन्यात असून, सीमेवर देशाचे रक्षण करण्यात मग्न आहे. सैन्यात गेल्यापासून एकदाही रक्षाबंधन, भाऊबीजसारख्या सणांना त्याचा सहवास लाभू शकला नाही. अशा सणांच्या वेळी इतर बहिणींकडे पाहून मन भरून येते. उदास वाटते. पण त्याचवेळी आपला भाऊ आपल्याच देशवासीयांच्या रक्षणासाठी झटतो आहे हा विचार मनात येऊन त्याचा अभिमान वाटतो. रक्षाबंधनच्या दिवशी मी त्याला फोन करते. एरवी तर आमचे फोनवर बोलणे होतच असते; मात्र रक्षाबंधनच्या दिवशी त्याच्याबरोबरचा फोनवरचा संवाद हा खूप आनंद देऊन जातो.
- मनीषा जैन, राका कॉलनी, नाशिक (गणेश शिंदे यांची बहीण)