सीमेवर देशसेवा करणाऱ्या जवानांचे रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 07:00 PM2021-08-22T19:00:19+5:302021-08-22T19:01:10+5:30

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.

Rakshabandhan of soldiers serving the country at the border | सीमेवर देशसेवा करणाऱ्या जवानांचे रक्षाबंधन

पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात परिसरातील सैनिकांना बोलावून राख्या बांधतांना विद्यार्थिनी. समवेत मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, ग्रामस्थ व शिक्षक.

googlenewsNext
ठळक मुद्देपाडळी : पाताळेश्वर विद्यालयाचा २५ वर्षांपासून उपक्रम

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. सुमंतकाका गुजराथी यांच्या प्रेरणेतून विद्यालयातील विद्यार्थिनी स्वत:च्या प्रेरणेने राख्या जमा करून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवितात. आतापर्यंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एक लाख राख्या पाठविल्या आहेत. प्रत्येक वर्षी पाडळी, आशापूर, ठाणगाव, हिवरे, पिंपळे, टोळेवस्ती, बोगीरवाडी, पलाट व ठाकरवाडी परिसरातील सीमेवर लढणारे जवान यांना बोलावून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावर्षी दशरथ मधुकर पाटोळे, नितीन सुकदेव पाटोळे, संतोष भीमा पाटोळे, विजय रंजन पालवे, सूरज विष्णू जाधव, संदीप शंकर पाटोळे, वैभव बाळासाहेब रेवगडे या जवानांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. जे जवान भारतीय सीमेवर अहोरात्र आपल्यासाठी झटतात व देशाचे रक्षण करतात त्यांच्या प्रती प्रेमभावना व्यक्त करणे व आपण सर्वांनी प्रेरणा घेऊ असे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी माजी सरपंच चंद्रभान रेवगडे यांनी मनोगत व्यक्त केले. जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. आपण सर्वांनी महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलूया असे आवाहन केले.
या जवानांनी आम्ही देश रक्षणासाठी व आमच्या बांधवांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू असा संदेश दिला व आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते ते या आमच्या भगिनींचे व आम्हाला शिकविणाऱ्या गुरुजनांचे असल्याचे सांगितले. आतापर्यंत विद्यालयातील व परिसरातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी देश रक्षणासाठी सीमेवर लढतात ही विद्यालयासाठी भूषणाची बाब असल्याचे सांगितले. या जवानांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.
 

 

Web Title: Rakshabandhan of soldiers serving the country at the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.