नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:55 PM2019-07-12T15:55:58+5:302019-07-12T16:06:16+5:30
देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे.
नाशिक - देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. वडाळा गावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाज नंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच देशाची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या समाजकंटकांचा निषेध नोंदविण्यासाठी छोटेखानी पद्धतीने निषेध सभा घेण्यात आली.
मशिदीचे इमाम मौलाना जुनेद आलम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित मुस्लिमांनी मूक निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वीच झारखंड राज्यातील सराईकेला जिल्ह्यात तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला चोरीच्या संशयावरून जमावाने एकटे गाठून गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट लाट उसळली असून ठिकाणी निषेध होत आहे.
देशातील जमाव हल्ले थांबवा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे .या पार्श्वभूमीवर वडाळा गावातील गौसिया मशिदीच्या आवारात जुम्माच्या नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. धर्मगुरूंच्या सुचनेप्रमाणे कुणीही घोषणाबाजी न करता केवळ मूक निषेध नोंदविला. जमाव हल्ले करून निष्पाप नागरिकांना मारणार्यांचा सरकारने त्वरित बंदोबस्त करावा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि या देशात कायदा व सलोका कायमस्वरूपी राखला जावा यासाठी राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली.
मौलाना जुनेद आलम यांनी प्रार्थना करत भारताच्या प्रगतीसाठी व कायदा व्यवस्था टिकून राहण्यासाठी विशेष दुवा मागितली यावेळी उपस्थितांनी आमीन म्हणून प्रतिसाद दिला सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सुमारे वीस मिनिटात या निषेध सभेत समाजकंटकांनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली.
सोमवारी दलित-मुस्लिम मोर्चा
मॉब लिंचिंग विरोधात जुन्या नाशकतील चौक मंडईतून सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दलित- मुस्लिम बांधव जिल्हाभरातून सहभागी होणार आहेत. मोर्चाचे आयोजन मुस्लिम दलित संघर्ष समितीने केले आहे. मोर्चा जुने नाशिकमधून सुरू होऊन जिपीओ रस्त्याने ईदगाह मैदानावर पोहचणार आहे. मोर्चात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.