नाशिकमध्ये चर्मकार समाजाचा मागण्यांसाठी मोर्चा
By श्याम बागुल | Published: September 14, 2018 03:44 PM2018-09-14T15:44:15+5:302018-09-14T15:45:44+5:30
माजीमंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे विसर्जन
नाशिक : चर्मकार समाजावर वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी राष्टÑीय चर्मकार महासंघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
माजीमंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे विसर्जन करण्यात येऊन मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संत रविदास महाराज जयंती दिनी शासकीय सुटी जाहीर करावी, चर्मोद्योग विकास महामंडळाची सर्व कर्जमाफ करण्यात यावी, मंडळाला नवीन भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, राज्यात चर्मकार समाजावर झालेल्या अन्याय, अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, गटई कामगारांचे स्टॉल आहे त्याच जागेवर ठेवावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात दत्तात्रय गोतिसे, खंडेराव गांगुर्डे, प्रमोद नाथेकर, आनंदा महाले, प्रकाश पवार, पिंटू गांधले, सतीश साबणे, मनोज म्हैसधुणे, विनोद शेळके, भास्कर गटबांधे, अरविंद चव्हाण, श्रीराम अहिरे आदी सहभागी झाले होते.