रुबेला-गोवर लसीकरण जनजागृतीसाठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:09 AM2018-11-27T00:09:47+5:302018-11-27T00:10:18+5:30
पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेस मंगळवार (दि.२७) पासून प्रारंभ होत असून, ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे चौदा कोटी मुला-मुलींना ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे.
नाशिक : पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेस मंगळवार (दि.२७) पासून प्रारंभ होत असून, ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे चौदा कोटी मुला-मुलींना ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयातर्फे सोमवारी (दि़२६) शहरातून रॅली काढण्यात आली़ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती यतिन पगार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्र्यंबक नाका, सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूररोड, पंडित कॉलनी, टिळकवाडी मार्गे जिल्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप झाला. जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळांमधील मुलांना त्याठिकाणी जाऊन आरोग्य विभागातर्फे लसीचे इंजेक्शन दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, माता-बाल संगोपण विभाग, बाल स्वास्थ्य केंद्र या विभागाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत़ नाशिक जिल्ह्यातील रुबेला-गोवर लसीकरण मोहिमेसाठीची आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली असून शहरी भागात नऊ लाख तर ग्रामीण भागात बारा लाख असे एकूण २१ लाख मुला-मुलींना रुबेला-गोवर लसीकरणाचे इंजेक्शन महिनाभराच्या कालावधीत दिले जाणार आहे़