न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:03 PM2019-11-10T19:03:21+5:302019-11-10T19:03:52+5:30
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला.
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला.
शाळेचे दिवस संपले की प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात धाव घेतो. मात्र ज्या शाळेमध्ये आपण शिकलो लहानाचे मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला घडविले आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र दिले त्याच शाळेत भेट पुन्हा नव्याने म्हणत शाळेची नवीन इमारत बघण्यासाठी तसेच आपली शाळा, गुरुजनांशी असलेले ऋणानुबंध आणखी बळकट करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्य राजेंद्र गडाख हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. प्रवीण शेलार, संपत गडाख हे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना येणाऱ्या प्रसंगांना आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सामोरे जावे. इच्छाशक्तीच्या बळावर माणूस कोणतेही यश संपादन करू शकतो, असे सांगत प्राचार्य गडाख यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतीक बेलोटे, आदित्य गव्हाणे, महेश हांडोरे, दीपक राऊत, धनंजय बेलोटे, प्रदीप थोरात यांनी मनोगत व्यक्त करत शाळेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुवर्णा हांडोरे हिने प्रास्ताविक केले. तर किरण खाडे याने सूत्रसंचालन केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा भेट देण्यात आली. या मेळाव्यास रूपाली हांडोरे, महेश डुंबरे, प्रकाश कणकुसे, हर्षल यादव, समाधान सैंद्रे, किशोर थोरात, सचिन थोरात, ऋषिकेश डुंबरे, धनंजय थोरात, शुभम सैंद्रे, अजय डुंबरे आदी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.