धनगर समाजाचा मेंढरांसह सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:46 PM2018-08-27T16:46:16+5:302018-08-27T16:47:26+5:30
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर शेळ्या-मेंढरांसह मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा देत भर पावसात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यानंतर तहसीलदार नितीन गवळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
येथील हुतात्मा स्मारकापासून सकाळी मोर्चास प्रारंभ झाला. भंडारा उधळत व हातात पिवळे झेंडे घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. ‘बसं झालं राजकारण , आता फक्त आरक्षण, पिवळा झेंडा फडकला, धनगर राजा भडकला, येळकोट येळकोट जय मल्हार’ आदिंसह विविध घोषणा देत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा नेण्यात आला. विविध घोषणांसह डफांचा ताल व धनगर नृत्य सादर केले जात होते. यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. खांद्यावर घोंगडी, हातात काठी व डोक्याला भंडारा असलेली वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याठिकाणी छोटेखानी सभा झाली. धनगर समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर सभेस प्रारंभ झाला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी हजेरी लावून धनगर समाजाच्या मागणीला पाठींबा असल्याचे जाहीर केले. धनगर समाज न्याय हक्कासाठी लढा देत असून त्यांना न्याय मिळावा यासाठी आपला पाठींबा असल्याचा आमदार वाजे यांनी सांगितले. तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून भटकंती करीत उपजीविका करणाऱ्या धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी माजी आमदार कोकाटे यांनी केली. आतापर्यंत धनगर समाजाचा उपयोग फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी झाला. मात्र सत्ता आल्यानंतर या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वक्त्यांनी केली. समाज आणि नेते आडाणी असल्याने राज्यकर्त्यांनी समाजाचा केवळ फायदा घेत आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य योगिता कांदळकर, बाबासाहेब कांदळकर, दीपक सुडके, संदीप जाधव, शिवाजी जाधव, संतोष बिरे, खंडेराव दैने, सी. डी. भोजणे, एकनाथ देवकर, भाऊसाहेब ढेपले, संदीप ढवण, रामनाथ बुजडे, मारुती शिंदे, रामचंद्र नरोडे, राजेंद्र शेळके, रमेश गावडे, ज्ञानेश्वर खाटेकर, शिवाजी हालवर, बबन भडांगे, अण्णा ढोणे, भास्कर सैंदर, कैलास आडभाई यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते.