मोदी म्हणाले, ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’; नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांच्या स्वरात प्राणप्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:04 AM2024-01-24T08:04:10+5:302024-01-24T08:04:24+5:30

या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात पूजाविधीतील श्लोक उच्चारण माइकवरून करताना दिसल्याने नाशिककरांचा ऊरदेखील अभिमानाने भरून आला. 

Ram Mandir Pranapratistha in the voice of Shantaramshastri Bhanose of Nashik | मोदी म्हणाले, ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’; नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांच्या स्वरात प्राणप्रतिष्ठा

मोदी म्हणाले, ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’; नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांच्या स्वरात प्राणप्रतिष्ठा

- धनंजय रिसोडकर

नाशिक : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूजाविधी सांगणाऱ्या प्रमुख ५ पुरोहितांमध्ये नाशिकच्या वेदशास्त्रसंपन्न पुरोहित शांतारामशास्त्री भानोसे यांचा समावेश होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भानोसे यांच्याकडे बघून ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ असे सांगत पूजाविधीतील सर्व बाबींची साग्रसंगीत पूर्तता केल्याचे वेशासं भानोसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

संपूर्ण पूजाविधीमध्ये प्रभू रामचंद्रांची १०८ नावे अर्थात नामावली घेऊन चांदीची पुष्पे रामलल्लांच्या चरणाशी अर्पण करण्याचा विधी आपल्याला करायचाच आहे, असे स्वत: पंतप्रधानांनीच सांगितले. त्यामुळे तो सर्व विधी करूनच प्राणप्रतिष्ठा पूजनाची सांगता झाली.  

देशातील २१ गुरुजींनाच संधी
यजुर्वेदीय परंपरेतील तज्ज्ञांना अयोध्येत बोलावण्याचा निर्णय प्रधान आचार्य काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित आणि गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनात झाला. त्यानुसारच नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांना पाचारण केले. सोहळ्यात देशभरातील २१ गुरुजींना ही संधी लाभली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात थेट गर्भगृहात पंतप्रधानांनजीक बसून पूजाविधीचा प्रयोग चालवण्याची संधी वेशासं भानोसे यांना लाभली. या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात पूजाविधीतील श्लोक उच्चारण माइकवरून करताना दिसल्याने नाशिककरांचा ऊरदेखील अभिमानाने भरून आला. 

अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गर्भगृहात असलेल्या ५ प्रमुख पुरोहितांमध्ये अर्थात पंच महापंडितांमध्ये समावेश होण्याचा आनंद शब्दातीत असून, जीवनाचे सार्थक झाल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूजा विधीतील शोडषोपचाराचे श्लोकदेखील पाठ असल्याचे बघून विशेष वाटले.      - वेशासं. शांताराम शास्त्री भानोसे

Web Title: Ram Mandir Pranapratistha in the voice of Shantaramshastri Bhanose of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.