पाच लाख मंदिरांमध्ये होणार रामनामाचा गजर, मिलींद परांडेंची माहिती
By संकेत शुक्ला | Published: January 9, 2024 08:42 PM2024-01-09T20:42:17+5:302024-01-09T20:47:06+5:30
दीडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
नाशिक : श्रीराम मंदिर प्राणप्रतीष्ठा सोहळ्यात केवळ भारतीयच नाही तर जगातील साठ देशातही विश्व हिंदू परिषदेने उत्सवाचे नियोजन केले आहे. यामध्ये २२ तारखेला ५ लाख मंदिरांमध्ये रामनामाचा गरज होणार असून त्यासाठी किमान २० कोटी घरांमध्ये जाण्याचे उद्दिष्ट्य असल्याची माहिती विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी दिली.
शंकरचार्य न्यास येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय मंत्री अनिल चांदवडकर, शहराध्यक्ष विराज लोमटे, शहर मंत्री योगेश बहाळकर उपस्थित होते. परांडे म्हणाले की, या उत्सवांद्वारे, विहिंप सर्वच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन, इंडो-बर्मीज, मंगोलियन आणि युरोपियन देशातील करोडो हिंदू सहभागी होणार आहे. दीडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
२३ जानेवारी पासुन मंदीर भाविकांना खुले होणार आहे. २७ जानवारी पासुन विहीपचे कार्यकर्ते टप्या टप्प्याने अयोध्येत येणार आहेत. राज्यातल दहा हजार कार्यकर्त्यांना नेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी राजकारण सोडून प्रत्येकाने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन परांडे यांनी यावेळी केले. राममंदिराच्या कार्यक्रमाला होरारा विरोध दुर्देवी असून त्याबद्दल वाईट वक्तव्ये करणाऱ्यांना निवडून द्यायचे की नाही याचा निर्णय जनतेनेच घ्यायचा असल्याचे ते म्हणाले.
मंदिराची रचना विशेष
मंदिराचा पहिला मजला बांधून तयार झाला आहे. त्याच्या आणखी दोन मजल्यांचे काम होणार आहे. यात गर्भगृहाजी रचना विशेष करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी या गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीवर दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे पडतील अशी व्यवस्था त्यात करण्यात आली आहे. गुजरातमधील पारंपरिक मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी अशी रचना केल्याचे त्यांनी सांगितले.
आता मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार
रामजन्मभूतीच्या लढ्याला यश आल्यानंतर आत भव्य मंदिर बांधण्याबरोबरच देशभरातील हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आगामी कार्यक्रम आखला जाईल. विश्व हिंदू परिषद त्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देईल. याशिवाय सगळ्या देशभरात गोहत्या बंदीचा कायदा यावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.