रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ
By संकेत शुक्ला | Published: April 20, 2024 12:06 AM2024-04-20T00:06:03+5:302024-04-20T00:06:42+5:30
अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.
नाशिक : विविध ढोलपथकांचा जल्लोष... रांगोळीने सजविण्यात आलेले रस्ते... सुवासिनींकडून रथाचे ओवाळून केले जाणारे स्वागत आणि विविध मंडळांसह भाविकांकडून होत असलेल्या रामनामाचा जयघोष अशा वातावरणात सायंकाळी साडेसहा वाजता कामदा एकादशीला काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून पारंपरिक पद्धतीने श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्यात आली.
अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या राघवेंद्रबुवांना पांढरा फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार मानकरी रवींद्र दीक्षित, नंदन दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आले. नारळ वाढवून आरती करून हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली. श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन राघवेंद्रबुवा यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर उभे असलेले दोन्ही रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी दुमदुमली होती.
रथोत्सवासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार राहुल ढिकले, राजाभाऊ वाजे, महंत भक्तिचरणदास, खासदार हेमंत गोडसे, दशरथ पाटील, लक्ष्मण सावजी, रंजन ठाकरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, गुरुमित बग्गा, डॉ. सुनील ढिकले, शेखर ढिकले, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
गरुड रथाचे रोकडोबा पटांगणात आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला, तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरी पटांगणात आगमन झाले असता या ठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. गरुड रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे तर राम रथ ओढण्याचा मान सरदार रास्ते तालीम संघ व समस्त पाथरवट समाजाकडे होता. गरुड रथाचे सूत्रसंचालन चंदन पूजाधिकारी, तर रामरथाचे सूत्रसंचालन नंदकुमार मुठे यांनी केले.
दोन्ही रथ रामकुंडावर आल्यानंतर अभिषेक
दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृतपूजा, पंचामृत अभ्यंगस्नान, अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी भाविकांनादेखील या उत्सवमूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. वर्षातील एकच असा हा दिवस असतो की, यावेळी काळाराम मंदिरात असलेल्या उत्सवमूर्तींना सामान्य नागरिक स्नान घालू शकतो; त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
रथयात्रेत अवतरले सीता, राम अन् हनुमान...
रथोत्सवाच्या अनेक ठिकाणी स्वागत होत असताना अनेक ठिकाणी व्यासपीठावर राम, सीता, हनुमान व लक्ष्मण वेशात मुले सजली होती; तर मिरवणुकीतही सीतेसह रामाची वेशभूषा परिधान केलेले कलावंत भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.