राम मंदिर भाजपाच्या अजेंड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:59 AM2018-11-12T01:59:00+5:302018-11-12T01:59:21+5:30
भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर विकासासोबतच राम मंदिराचा मुद्दाही असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर विकासासोबतच राम मंदिराचा मुद्दाही असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदासंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्यांनी रविवारी (दि.११) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदासंघांमधील तयारीचा आढावा घेतला. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदी उपस्थित होते. दानवे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
गेल्या पंधरवड्यातच पेट्रोलचे दर ९१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले असतानाही दानवे यांनी कुठे आहे महागाई? असा प्रतिप्रश्न करीत महागाईच्या प्रश्नांना मात्र बगल दिली. त्यासोबतच धुळे येथील दानवे यांच्या सभेत अनिल गोटे यांच्या गटाने गोंधळ घातल्याच्या मुद्द्यावरही ही संघटनात्मक बाब असल्याचे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
इन्फो-१
नाशकात मतभेद नाही
धुळे येथील आढावा बैठकीत भाजपामधील स्थानिक नेत्यांमध्ये असलेली खदखद प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर बाहेर पडली. त्यामुळे नाशिकमध्येही भाजपाच्या तिन्ही आमदारांचे वेगवेगळे गट असल्याची चर्चा सुरू झाली असून, अन्य पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांचेही स्वतंत्र गट असल्याचे बोलले जात आहे. परंतु, नाशिकमध्ये असे कोणतेही गटतट नसल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी स्थानिक नेत्यांच्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न के ला.
इन्फो-२
मत वाढण्यासाठी कोणालाही प्रवेश
धुळे येथील सभेत एका संशयित गुंडाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावर स्पष्टीकरण देताना संबंधित व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला असला तरी कोणतेही पद अथवा जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे असा प्रवेश म्हणजे केवळ पक्षाचे एक मत वाढविण्याचा प्रकार असून, अशाप्रकारे मत वाढविण्यासाठी कोणालाही प्रवेश द्यायला हरकत नसल्याची भुमिका त्यांनी घेतली.