राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:28 AM2020-08-03T01:28:11+5:302020-08-03T01:28:58+5:30
राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
नाशिक : राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
सिडको परिसरात तयार करण्यात आलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. यापार्श्वभूमीवर आव्हाड यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत प्रभू श्रीराम कुण्या एकाच्या सातबारावर नाहीत आणि तो सातबारा कुणाच्या मालकीचादेखील नसल्याचे विधान करीत भाजपवर निशाणा साधला. श्रीरामाच्या नावाने भक्ती करणे आणि राजकारण करणे वेगळे असून, भाजपने गेली ४० वर्षे श्रीरामाच्या नावानेच राजकारण केले, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.
दरम्यान, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमितील आपण भूमिपुत्र असून, महाराष्ट्र कोरोनामुक्त होवो अशीच आपली प्रार्थना असल्याचे आव्हाड म्हणाले.
या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक किरण गामणे, बाळा दराडे, सुधाकर बडगुजर, पुंजाराम गामने, महानगरप्रमुख महेश बडवे, दीपक गामने आदी उपस्थित होते.