राम जन्मला गं सखे राम जन्मला..
By admin | Published: April 6, 2017 01:00 AM2017-04-06T01:00:50+5:302017-04-06T01:01:05+5:30
नाशिक : जिल्ह्यात ठिकठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले
नाशिक : जिल्ह्यात ठिकठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. येवला, लासलगाव, निफाड व त्र्यंबकेश्वर आदि ठिकाणी उत्साहात मिरवणूक काढण्यात येऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा करून बालकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलांनी पाळणा सादर केला.
लासलगाव
लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पालखी मिरवणुकीला यंदा उत्साहात सुरुवात झाली. हजारो युवक व शेकडो महिला भगव्या टोप्या परिधान करून टाळ वाजवीत श्रीरामाचे भजन गात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. विविध चित्ररथ या पालखी शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्रीराम मंदिरासमोर महाआरतीने या पालखीची सांगता झाली. श्रीरामनवमीनिमित्त मंदिराच्या बाहेर रांगा लावून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
येवला
येवला येथील वनवासी श्रीराम मंदिर, गंगादरवाजा येथे प्रभू रामचंद्रांचा मूर्ती महाभिषेक मुंबईतील दत्ता व आशा नानकर, शिवराम व उषा नागपूरकर (इंदूर), निखिल व मोनिका पावलीकर (ठाणे), बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. नागेश्वर टेकेश्वर आश्रमाचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रभुरामचंद्रांच्या जन्मावर प्रवचन झाले. सुंदरराम मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत भव्य श्रीराम कथा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोरख महाराज काळे यांचे प्रभुरामचंद्रांच्या जन्मावर कीर्तन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पहिलवान, प्रभाकर झळके, दयानेश्वर नागपुरे, राजेश नागपुरे, जयंत नागपुरे, नारायण घाटकर, मुरलीधर नागपुरे, सुनील नागपुरे, बंडू आहेर, सचिन नागपुरे, मंगेश पैठणकर, विनायक आहेर, अमित लाड, किशोर ठाकूर, संजय टोणपे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
येथील पाटील वाड्याजवळील विठ्ठल मंदिरात रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. येवले तालुक्यातील प्रसिद्ध श्री रोकडे हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महिला भजनी मंडळही उपस्थित होते. रामजन्मानंतर भजनी मंडळाला अल्पोपहार व सरबताचे वाटप करण्यात आले. भक्तांना पंजिरीचा प्रसाद वाटप झाले. अनेक भाविकांनी या प्रसंगी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. उत्सवामुळे परिसरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार वसंत संत यांनी केले. रोहित पाटील, सतीश संत, अमित पाटील, बाळासाहेब देशमुख यांनी परिश्रम घेतले.
रामनवमीच्या पावनदिनी विविध कार्यक्र म घेऊन रामजन्म उत्सव समितीने प्रभूरामांच्या भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे पाच हजार युवक यात सहभागी झाले होते.
यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी येथील वनवाशी राममंदिरापासून प्रभुरामचंद्र यांच्या प्रतिमेची ७५ युवकांच्या हिंदू राजा ढोल ताशा पथकाच्या वाद्यवृंदाच्या सहभागाने सवाद्य मिरवणूक काढून शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत विंचूर रोडवर मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली. प्रभू राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचा सजीव देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला, तर मिरवणूक मार्गात सह्याद्री ग्रुपमधली गल्ली येथे रवि पवार, राहुल भावसार, सुनील भावसार, संतोष गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरबताचे भाविकांना वाटप केले. १५ बाय १५ मीटर भगव्या कापडाचा ध्वज शहरातून मिरवण्यात आला. हरहर महादेव, प्रभुरामचंद्राचा जयजयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. (लोकमत चमू)