...तर सोमवारी रमजान ईद
By admin | Published: June 24, 2017 10:48 PM2017-06-24T22:48:05+5:302017-06-24T22:48:05+5:30
चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल.
नाशिक : रमजान पर्वचे शनिवारी २८ उपवास पूर्ण झाले असून, रविवारी (दि.२५) रमजान महिन्याची २९ तारीख असल्याने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल.
इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असून अमावस्येनंतर दिसणारी चंद्रकोर बघून महिना बदलतो. सूर्यास्तानंतर पुढील दिवस मोजला जातो. शनिवारी संध्याकाळी रमजान महिन्याच्या २९ तारखेला सुरुवात झाली. त्यामुळे रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडू शकते, मुस्लीम बांधवांनी चंद्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा, असे विभागीय चांद सम्तीने परिपत्रकात म्हटले आहे. चंद्रदर्शन झाल्यास त्याची माहिती प्रत्यक्ष शाही मशिदीत उपस्थित राहून धर्मगुरूंच्या बैठकीत द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याबाबत साशंकता आहे, कारण शनिवारी दिवसभर ढगाळ हवामानासह संततधार पाऊस सुरू होता; मात्र लहरी निसर्गाने पुन्हा रूप बदलल्यास संध्याकाळी चंद्रदर्शन होऊ शकते. चंद्रदर्शनाची अधिकृत घोषणा व रमजान ईद संदर्भातील निर्णय खतीब यांच्या नेतृत्वाखाली शाही मशिदीत रविवारी संध्याकाळी आयोजित बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे.